मुंबई (Mumbai) : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या समृद्धी महामार्ग नागपूरपासून पुढे गोंदियापर्यंत विस्तारला जाणार आहे. भंडारा ते गडचिरोली, नागपूर ते चंद्रपूर आणि नागपूर ते गोंदिया या जिल्ह्यांपर्यंत समृद्धी महामार्ग विस्तारणार आहे. यानिमित्ताने राज्याची पूर्व व पश्चिम सीमा एकसंधपणे जोडली जाणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणामागे नागपूर शहरास मागे गडचिरोली, भंडारा आणि पुढे मुंबईशी प्रवेश नियंत्रित द्रुतगती महामार्गाने जोडणे हा पहिला उद्देश असून, राज्याच्या पूर्व आणि पश्चिम सीमांना द्रुतगती महामार्गाने जोडणे, देशाच्या उत्तर आणि ईशान्येकडील मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांशी आंतरराज्यीय संपर्क स्थापित करणे, आंतरराज्यीय प्रवासी आणि माल वाहतुकीमुळे समृद्धी महामार्गाची व्यवहार्यता सुधारण्यासाठी मदत होईल, सोबतच पूर्व महाराष्ट्रातील अल्प विकसित जिल्ह्यांचा सामाजिक-आर्थिक विकास होण्यास मदत होणार असल्याचाही उल्लेख विस्तारीकरणाच्या कामाबाबत काढण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.
कोळसा, चुनखडी, मॅंगनीज, लोहखनिज आदी गौण खनिज पूर्व विदर्भातील जिल्ह्यात आढळतात. सर्वेक्षणानुसार, 6,956 दशलक्ष टन खनिजांचे साठे विदर्भात आहेत. नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात याचे मोठे साठे आहेत. तेव्हा या गौण खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गे आणि ती जलद गतीने होणार असल्याने या समृद्धी महामार्गाचे विस्तारीकरण करण्यात येत असल्याचे सांगितले जाते. यानिमित्ताने राज्याची पूर्व व पश्चिम सीमा या एकसंधपणे जोडली जाणार आहे, अशी पोस्ट प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाज माध्यमाद्वारे केली आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी अंतराचा आहे. त्यापैकी नागपूर ते भरवीर असा ५८१ किमीचा टप्पा सुरू झाला आहे. भरवीर ते नागपूर अंतर सहा तासात पार करता येत आहे. मुंबई ते भरवीर या उर्वरित टप्प्याचे कामही सध्या सुरू आहे.
कसा होणार समृद्धी महामार्गाचा विस्तार?
भंडारा ते गडचिरोली 142 किलो मीटर
नागपूर ते चंद्रपूर 194 किलो मीटर
नागपूर ते गोंदिया 162 किलो मीटर