मुंबई (Mumbai) : राज्यात अंत्योदय रेशनकार्डवर मोफत वाटप केल्या जात असलेल्या साड्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या आहेत. महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’ यासंदर्भातील सविस्तर वृत्त ‘टेंडरनामा’ने मंगळवारी प्रसिद्ध केले आहे. तसेच फक्त जाहिरातबाजीसाठी राज्यातील गरीब महिला भगिनींची चेष्ठा करता का अशी सडकून टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली होती. त्यानंतर आता साड्यांबाबत काही तक्रारी असतील तर संपर्क करावा असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाने केले आहे.
वस्त्रोद्योग विभागाने केलेल्या आवाहनानुसार, राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटूंबातील माता-भगीनींच्या सन्मानासाठी प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी मोफत देण्यासाठी वस्त्रोद्योग विभागामार्फत कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे राज्यातील २४ लाख ८० हजार अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांतील माता-भगीनींना साड्यांचा लाभ मिळाला आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांच्या कापसाला मागणी वाढून सूतगिरणींच्या सुताला भाव व स्थानिक यंत्रमागधारकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या साड्या पुरवठा करण्याकरिता वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ, नवी मुंबई या महामंडळास नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या महामंडळाने ई-टेंडरद्वारे निश्चित करण्यात आलेल्या पॅनल मधील सहकारी संस्था / एमएसएमईकडून साड्यांचे उत्पादन करून घेतले आहे.
११ मार्च २०२४ पर्यंत महामंडळाने राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील तालुका स्तरावरील गोडाऊनपर्यंत सर्व साड्यांचा १०० टक्के पुरवठा पूर्ण केला आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेकडून आजअखेर १३ लाख १७ हजार साड्यांचे वितरण पूर्ण झाले असून, शिल्लक साड्यांचे त्वरित वितरण करण्याच्या सूचना अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. या साड्यांचे मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या तालुक्यातील यंत्रमागधारकांकडून उत्पादन होत असताना, उत्पादनात अनावधानाने काही दोष राहू शकतील. तसेच प्रोसेसिंग, वाहतूक करताना इत्यादी मध्ये साड्या खराब होतील, ही शक्यता गृहीत धरूनच शासनाने ही योजना तयार करते वेळी, जर साड्या पुरवठ्याच्या वेळी निर्मिती दोष, फाटलेल्या किंवा कमी लांबीच्या आढळल्यास त्या बदलून देण्याची तरतूद अगोदरच शासन निर्णयामध्ये केली आहे.
राज्यामध्ये काही दुकानात खराब साड्या, फाटलेल्या साड्या मिळाल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तथापि आतापर्यंत निदर्शनास आलेल्या खराब झालेल्या साड्या या काही ठिकाणच्या असून, या पुरवठा करण्यात आलेल्या साड्यांच्या प्रमाणात फारच अत्यल्प प्रमाणात आहेत. तरी त्या ठिकाणी महामंडळाने आपले अधिकारी पाठवून त्वरित साडी बदलून देण्याची व्यवस्था केली आहे. तसेच महामंडळाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले अधिकारी पाठवून साडीचा दर्जा, पुरवठा व वितरणाबाबत तपासणी अहवाल मागवला आहे. सदर अहवालानुसार जर काही साड्या निर्मितीदोष अथवा फाटलेल्या आढळल्यास त्या त्वरित बदलून देण्याची व्यवस्था महामंडळाने अगोदरच कार्यान्वित केलेली आहे. याबाबत काही तक्रारी असतील तर info@mspc.org.in ई-मेलवर तक्रार करावी किंवा 022-27703612 नंबर वर (कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायं. 6.15) यावेळत संपर्क करावा असे आवाहन वस्त्रोद्योग विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.