मुंबई (Mumbai) : राज्यात 2 हजार 500 मेगावॅट क्षमतेपर्यंत अल्ट्रामेगा नवीकरणीय सौरऊर्जा पार्क उभारण्यासाठी महानिर्मिती कंपनीस (MAHAGENCO) एनटीपीसी (NTPC) सोबत संयुक्त कंपनी स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या (State Cabinet) बैठकीत नुकतीच मान्यता देण्यात आली.
राज्यात अडीच हजार मेगावॅट क्षमतेपर्यंतचा अल्ट्रामेगा सौरऊर्जा पार्क विकसित करण्याकरिता नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड व महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती कंपनीचा हा प्रकल्प असेल. यामध्ये दोघांची गुंतवणूक पन्नास-पन्नास टक्के असेल. यासाठी ऊर्जा विभाग नोडल एजन्सी म्हणून काम करील. राज्य सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा धोरणाशी सुसंगत अशा बाबींचे पालन करण्याची जबाबदारी या समितीवर टाकण्यात आली आहे.
अपारंपरिक ऊर्जासाठी 17 हजार 360 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीचे प्रकल्प 21 मार्च 2025पर्यंत विकसित करण्यात येणार असून यापैकी 16 हजार 930 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची योजना आहे. राज्यात सध्या 9 हजार 305 मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित असून 2 हजार 123 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित होतील.