Mumbai News मुंबई : कोकणातील पर्यटनाच्या (Konkan Tourism) दृष्टीने महत्वपूर्ण ४९८ किलोमीटर रेवस-रेड्डी सागरी महामार्गावरील रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दीघी या दोन खाडीपुलांच्या टेंडरसाठी (Tender) दिग्गज कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगली आहे. (Konkan Costal Highway)
रेवस ते कारंजा खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तर आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकाॅन, टी अँड टी इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या कंपन्यांमध्ये चुरस आहे.
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी MSRDC) हा सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. या सागरी महामार्गासाठी नऊ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा सागरी महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला.
हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात रेवस-रेड्डी सागरी रस्त्याचा सुधारित आराखडा तयार करण्यात आला. आराखड्याला १६ मे २०२२ रोजी मंजुरी देण्यात आली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार केलेल्या ४९८ किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्त्यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित मार्ग दुपदरी आहेत.
सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत.
एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी या ४४७ किमीच्या सागरी किनारा मार्गावर आठ खाडीपूल बांधण्याचे नियोजन केले आहे. या आठ खाडीपूलापैकी रेवस ते कारंजा आणि आगरदांडा ते दीघी अशा दोन खाडीपुलाच्या बांधकामासाठी एमएसआरडीसीने टेंडर प्रसिद्ध केले होते.
त्यापैकी रेवस ते कारंजा खाडीपुलासाठी अशोका बिल्डकॉन आणि विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांनी टेंडर भरले आहे. आगरदांडा ते दीघी खाडीपुलासाठी अशोका बिल्डकाॅन, टी अँड टी इन्फ्रा तसेच विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन या तीन कंपन्या इच्छूक आहेत.
आता लवकरच कमर्शियल टेंडर खुले करून ठेका अंतिम केला जाणार आहे. लवकरच या दोन्ही खाडीपुलांच्या कामास सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.