मुंबई (Mumbai) : कल्याण शहरात गौरीपाडा येथे खासगी सार्वजनिक भागीदारी (पीपीपी PPP) तत्त्वावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका (KDMC) प्रशासनाकडून लवकरच त्यासाठी टेंडर (Tender) प्रसिद्ध केले जाणार आहे.
कल्याण डोंबिवलीत अद्ययावत रुग्णालय असावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून आहे. महापालिकेने शहरात विविध सुविधांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये रुग्णालयांचा देखील समावेश आहे. कल्याण येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय असावे, अशी मागणी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली होती.
यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील गौरीपाडा येथे हॉस्पिटलसाठी तीनमजली इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी १६ हजार चौरस फुटांहून अधिक जागेवर हे हॉस्पिटल बांधण्यात येणार आहे. शंभर बेडच्या या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधांसह हृदयविकारावरील उपचारांसाठी कॅथलॅबही असणार आहे. हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यासाठी लवकरच सल्लागार नेमण्यात येणार आहे.
स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी नुकतीच गौरीपाडा येथील जागेची पाहणी केली. या वेळी महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रसाद बोरकर, साथरोग नियंत्रण विभाग अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील आदी उपस्थित होते.
दरम्यान, महात्मा जोतिराव फुले आरोग्य योजनेंतर्गत सर्वसाधारण आजारांवर मोफत; तर अधिक खर्च असलेल्या आजारांवर अत्यल्प दरांमध्ये उपचार केले जाणार आहेत. यासाठी महापालिकेकडून आवश्यक त्या सर्व सुविधा देण्यात येतील, असे महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी सांगितले.
गौरीपाडा परिसरात हॉस्पिटलसाठी आरक्षित भूखंडावर ही तीनमजली इमारत बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी १६ हजार चौरस फुटांहून अधिक जागेवर हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभे राहते, याचा आनंद आहे.
- विश्वनाथ भोईर, आमदार