मुंबई (Mumbai) : कल्याण डोंबिवली महापालिकेअंतर्गत आधारवाडीमध्ये असलेला कचऱ्याचा डोंगर हटवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरु केले आहेत. कचऱ्याचे बायोमायनिंग करण्यात येणार आहे. सुमारे ४१२ कोटी रुपये खर्चाचे टेंडर काढून त्याचे काम पहिल्या टप्प्यात सुरु केले जाणार आहे.
महापालिकेने कचऱ्याचे डोंगर दूर करण्यासाठी राज्य सरकारकडे ९० कोटी रुपयांची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून ९० कोटी रुपये प्राप्त झाल्यास ४२ कोटी आणि ९० कोटी असे सुमारे १३० कोटी प्रकल्पाच्या कामावर खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या कंत्राटदाराने हे काम ३ वर्षात पूर्ण केल्यास दुसऱ्या टप्प्याचे काम ही त्याच कंत्राटदाराला दिले जाणार आहे. विघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया केली जाईल. तसेच अविघटनशील कचऱ्याची विल्हेवाट बायोमायनिंगमध्ये लावली जाईल. ही सगळी प्रक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने केली जाणार आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील क्लस्टरचा मास्टर प्लान सल्लागार कंपनीने तयार केला असून तो लवकरच अंतिम करण्यात येणार आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत अनेक इमारती जीर्ण, धोकादायक बनल्या आहेत. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शहरात क्लस्टर योजना लागू करावी, अशी मागणी होती. राज्य शासनाने कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश क्लस्टर योजनेत केल्याचे जाहीर केल्यानंतर महापालिकेकडून वेगाने हालचाली सुरू आहेत. क्लस्टर योजनेसाठी ठिकाण निश्चित करत बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. क्लस्टर योजनेचा मास्टर प्लॅन तयार असल्याची माहिती नुकतीच महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली. ते म्हणाले, यासंदर्भात छाननी सुरू असून छाननी पूर्ण होताच बैठक घेतली जाईल. त्यामध्ये प्रामुख्याने कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी, डोंबिवलीतील दत्त नगर, अहिरे परिसर हे दोन क्लस्टर प्रामुख्याने हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त दांगडे यांनी दिली.
ई ऑफिस प्रणाली राबवणारी कल्याण डोंबिवली महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरली. कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही ई ऑफिस प्रणाली राबवणारी राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे. प्रशासकीय कामकाज गतिमानतेने व्हावे या उद्देशाने प्रशासनाने ई ऑफिस प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे झटपट कामे मार्गी लागतील, विकास कामांच्या नस्ती, नागरिकांच्या तक्रारी गतिमानतेने संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतील अशी माहिती आयुक्त दांगडे यांनी दिली. विकास कामांच्या फाईल्स आता हाताळल्या जाणार नसून थेट ई प्रणालीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यापर्यंत पोहचणार आहेत. कल्याण डोंबिवली पालिकेत काही महिन्यांपूर्वी रस्ते बांधकामाची फाईल गहाळ झाल्याने एकच खळबळ उडाली होती. ही फाईल दुसऱ्या विभागात सापडली. या घटनेनंतर महापालिका आयुक्तांनी प्रशासनात ई ऑफिस प्रणाली राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या.