मुंबई (Mumbai) : राज्यात सत्तांतराच्या घडामोडी वेगाने सुरू आहेत. सत्ताबदल झाल्यास मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर त्याचे काय परिणाम होतील याची सर्वांना उत्सुकता आहे.
विशेषतः मुंबई महापालिकेचे सध्या सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड), मुलूंड गोरेगाव जाेड रस्ता, कचऱ्या पासून वीज निर्मिती यासह रुग्णालयांचा विस्तार, असे महाकाय प्रकल्प सुरू आहेत. तर, सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा प्रकल्प येत्या काळात सुरू होण्याची शक्यता आहे. अशा विविध महत्वाच्या प्रकल्पांसाठी मुंबई महापालिकेला तब्बल 70 हजार 686 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यास नव्या राज्य शासनाकडून मुंबई शहरातील या मोठ्या प्रकल्पांना कितपत सहकार्य मिळेल याबद्दल साशंकता आहे.
मुंबईला वेगवान बनवणाऱ्या सागरी किनारा मार्गाचे (कोस्टल रोड) काम सध्या वेगात सुरू आहे. मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. मुंबई महापालिका या प्रकल्पावर 12 हजार 721 कोटी रुपयांचा खर्च करीत आहे.
या प्रकल्पात प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटी असे दोन महाकाय बोगदे बांधण्यात येत आहेत. यामध्ये प्रत्येकी तीन लेनचे दोन बोगदे तयार करण्यात येत आहेत. यामधील 12.20 मीटर रुंद आणि 2.070 किमी लांब असणाऱ्या या एका बोगद्याचे काम 10 जानेवारी रोजी पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आल्यानंतर वर्ष पूर्ण व्हायच्या एक दिवस आधीच हा बोगदा खणून पूर्ण झाला आहे. पहिल्या 2 किमी बोगद्याचे काम पूर्ण होऊन त्यातील एक किलोमीटरवर परिसर हा वापरासाठी योग्य झाला आहे, तर दुसऱ्या बोगद्याचे कामही जोरात सुरू असून, आतापर्यंत 450 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यांत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होणार असून, प्रकल्प डिसेंबर 2023 ला मुंबईकरांच्या सेवेत येईल, असा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे 55.22 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई महापालिकेचा गोरेगांव-मुलूंड लिंक रोड हा पूर्व व पश्चिमेला जोडणारा दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. प्रकल्पात दोन्ही कडून रस्त्याचे रुंदीकरण केले जात आहे. या प्रकल्पात सायकल ट्रॅक, फूटपाथ या रस्त्यांवर असेल. येथे 4 किमीचा बोगदा केला जाणार आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवर संभाव्य वाहतुकीसाठी दिंडोशी सत्र न्यायालय ते संतोष नगर असा 1.26 किमीचा सहा पदरी हा उड्डाण पूल आहे. हा उड्डाण पूल 7 चौकांवरून जाणार आहे. दिंडोशी बसडेपो जवळ पादचारी पूल स्वयंचलित जिन्यासह प्रस्तावित आहे. गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता (जीएमएलआर) प्रकल्प' हा महानगरपालिकेने हाती घेतलेला महत्त्वाचा प्रकल्प असून, या जोडरस्त्याने मुंबई उपनगरातील पूर्व व पश्चिम भागाला जोडणारा चौथा जोडरस्ता उपलब्ध होणार आहे. जोडरस्त्याची लांबी १२.२ किलोमीटर असून, पश्चिम द्रुतगती मार्ग, गोरेगांव (पूर्व) येथील ओबेरोय मॉल ते पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड (पूर्व) येथील ऐरोली नाका चौकापर्यंत हा जोडरस्ता असणार आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई महानगरात एकूण ७ ठिकाणी एसटीपी प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. वरळीमध्ये ५०० दशलक्ष लीटर प्रतिदिन, वांद्रे येथे ३६० दशलक्ष लीटर प्रतिदिन, मालाडमध्ये ४५४ दशलक्ष लीटर प्रतिदिन, घाटकोपरमध्ये ३३७ दशलक्ष लीटर प्रतिदिन, धारावीमध्ये ४१८ दशलक्ष लीटर प्रतिदिन, भांडुपमध्ये २१५ दशलक्ष लीटर प्रतिदिन आणि वेसावे (वर्सोवा) येथे १८० दशलक्ष लीटर प्रतिदिन याप्रमाणे एकूण ७ केंद्र उभारणे नियोजित आहे. त्यासाठी सुमारे २६ हजार कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. मुंबई महापालिकेचा हा सुद्धा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
प्रकल्प आणि खर्च (कोटी)
-सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) - 7372.62
-गोरेगाव मुलूंड जोड रस्ता - 7847.66
-कचऱ्या पासून वीज निर्मिती - 6207.34
-सांडपाणी प्रक्रिया केंद्र - 15693.00
-पिंजाळ प्रकल्प - 14390.00
-जलबोगदे - 2650.00
-मिठी नदी प्रकल्प - 4033.15
-नद्यांचे पुनरुज्जीवन - 1832.28
-आश्रय योजना - 4251.18