मुंबई (Mumbai) : 'सिडको'ने (CIDCO) नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये (Ulve Node, Navi Mumbai) दिवाळीच्या मुहूर्तावर 7 हजार 849 घरांची लॉटरी जाहीर केली आहे. पण ही घरे परिसरातील खासगी व्यावसायिकांच्या गृहनिर्माण योजनांपेक्षा महाग आहेत. त्यामुळे 'सिडको'ने बांधलेली घरे स्वस्त मिळतील या अपेक्षेने अर्ज करणाऱ्या नागरिकांची निराशा झाली आहे. तसेच 'सिडको'च्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला गेला आहे. नागरिकांना परवडणाऱ्या दरात त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे हा 'सिडको'च्या गृहनिर्माण योजनांचा उद्देश आहे. प्रत्यक्षात 'सिडको' या मूळ उद्देशापासून दूर जात असल्याचे दिसून येते.
'सिडको'वतीने महागृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील उलवे नोड मधील बामणडोंगरी, खारकोपर पूर्व 2 ए, खारकोपर पूर्व 2 बी आणि खारकोपर पूर्व पी 3 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील नागरिकांकरीता 7 हजार 849 घरे उपलब्ध केली आहेत. या घरांसाठी 'सिडको'ने जाहीर केलेल्या किंमती जास्त असून त्या आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षाही महाग आहेत.
'सिडको'कडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांची किंमत 35 लाख रुपये निश्चित केली आहे तर उत्पन्न मर्यादा तीन लाख ते सहा लाख इतकी ठेवली आहे. 'सिडको'ने महागृहनिर्माण योजनेंतर्गतच पाच वर्षांपूर्वी घणसोली, खारघर, द्रोणागिरी, कळंबोली व तळोजा येथे काढलेल्या सोडतीमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरांच्या किंमती या 25 लाख ते 27 लाखांपर्यंत होत्या. मात्र त्यामध्ये आता जवळपास दहा लाखांची वाढ झालेली आहे. त्यामुळे 'सिडको'च्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
खाजगी विकासकांच्या तुलनेत 'सिडको'च्या किंमती खूप जास्त आहे. 'सिडको'ने निश्चित केलेल्या किंमतीमध्ये इतर खर्चाचा समावेश नाही. नोंदणी व मुद्रांक शुल्क तसेच विद्युत कनेक्शन व देखभाल दुरुस्ती याचे सुमारे ३ ते ४ लाख रुपयांची भर पडते. त्यामुळे 'सिडको'ची घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत.
'सिडको'च्या महागृहनिर्माण योजनेतील ही घरे आजूबाजूच्या खासगी विकासकांच्या घरांपेक्षा महाग असल्याने 'सिडको' या घरांच्या वाढीव किमतींचा पुनर्विचार करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.