मुंबई (Mumbai) : आरोग्य विभागामार्फत २०२१ मध्ये स्थगित करण्यात आलेली गट ‘क’ व गट ‘ड’ मधील विविध पदांसाठीची परीक्षा वीस महिन्यांपासून रखडली आहे. मात्र, गेल्या महिन्यात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वर्ग ३ व ४च्या १० हजार ९४९ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी आतापर्यंत सव्वादोन लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मात्र, परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही.
त्याचबरोबर, आरोग्य विभागाकडून रद्द झालेल्या परीक्षा शुल्काची १०० कोटींपेक्षा अधिक रक्कम अजूनही अडकली आहे. यामुळे विद्यार्थ्यांनी तिखट प्रतिक्रिया देताना राज्यात आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत असताना तुम्ही अजूनही जागे कसे होत नाही, असा सवाल आरोग्य विभागाला विचारला आहे. २०१९ मध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार तसेच पेपर फुटीच्या घटनांमुळे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही परीक्षा स्थगित केली होती. या परीक्षेसाठी राज्यातील जवळपास साडेआठ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांनतर ऑक्टोबर २०२१ मध्ये राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत गट क आणि गट ड मधील विविध पदांसाठी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेदरम्यान पेपर फुटणे, पेपर उशिरा मिळणे, बैठक व्यवस्था नसणे पेपर खासगी कॅबमधून परीक्षा केंद्रावर पोचणे, पेपर न मिळणे अशा सावळ्या गोंधळामुळे परीक्षा पुन्हा स्थगित केली होती.
सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांचे अर्ज
गेल्या महिन्यात पुन्हा आरोग्य विभागाची १०,९४९ जागांसाठी जाहिरात निघाली आहे. यासाठी पुन्हा २,१३,००० अर्ज अर्ज विद्यार्थ्यांनी भरले आहेत व यातून जवळपास २२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. मात्र, अजूनही परीक्षा कधी होणार, याची तारीख जाहीर झाली नाही.