मुंबई (Mumbai) : राज्यात ग्रामीण रस्ते सुधारणा कार्यक्रम राबविताना रस्तेबांधणीतील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यपद्धतींचा परिचय व्हावा या हेतूने ग्रामविकास विभागाचे १९ उच्चपदस्थ अधिकारी ८ दिवसांसाठी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जात आहेत. ग्रामविकास विभागाने यासंदर्भातील सरकारी निर्णय प्रसिद्ध केला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित (ADB) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी संस्थात्मक बळकटीकरण करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA) अंतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांना आशियाई विकास बँक यांच्यामार्फत अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. हा दौरा १३ ऑगस्ट २०२३ ते २७ ऑगस्ट २०२३ या कालावधीत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथे आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था (MRRDA) अंतर्गत कार्यरत १९ अधिकारी यांच्या गटास अभ्यास दौऱ्याकरिता सरकारने मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, आशियाई विकास बँकेच्या (ADB) आर्थिक सहाय्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रस्ते सुधारणा कार्यक्रम राबवित आहेत. एडीबीच्या कर्ज अटींच्या अनुषंगाने तांत्रिक सहाय्य सल्लागार (Technical Assistance) म्हणून सट्रा सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स प्रा. लि. सिकंदराबाद यांना आशियाई विकास बँकेमार्फत नियुक्त करण्यात आलेले आहे. सट्रा सर्व्हिसेस अँड सोल्युशन्स प्रा. लि. सिकंदराबाद, तांत्रिक सहाय्य सल्लागार यांचेमार्फत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी संस्थात्मक बळकटीकरण करण्यासाठी या संस्थेअंतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचे प्रमुख उद्धिष्ट महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कर्मचारी यांची क्षमता वाढविणे आणि महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अधिकाऱ्यांना आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कार्यपद्धतींचा परिचय व्हावा, ज्यायोगे संस्थेअंतर्गत कार्यरत अधिकाऱ्यांना त्यांच्या कामामध्ये वैविध्यपूर्ण कौशल्ये विकसित होतील, अशा व्यापक दृष्टीकोनातून आंतराष्ट्रीय प्रशिक्षण व अभ्यास दौरा आयोजित करण्याची पूर्व अट आहे.
या अभ्यास दौऱ्यासाठी राज्य शासन अथवा केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेतून निधीची मागणी करण्यात आलेली नाही वा करण्यात येणार नाही, असेही शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. हा अभ्यास दौरा पूर्ण झाल्यानंतर अभ्यास दौऱ्यासंबंधीचा विस्तृत अहवाल ग्राम विकास विभाग आणि सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. तसेच अभ्यास दौऱ्यात प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग अन्य अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी करावाकरावा असे शासनाचे निर्देश आहेत.
एकनाथ डवले, प्रधान सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, के. टी. पाटील, सचिव, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मुंबई, अभय धांडे, वित्तीय नियंत्रक, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, एस. एस. माने, मुख्य अभियंता, प्रमंग्रासयो, पुणे, पी. व्ही. पाटील, उप सचिव, ग्रामविकास विभाग, मंत्रालय, मुंबई, ज्योति कुलकर्णी, राज्य गुणवत्ता समन्वयक, प्रमंग्रासयो, पुणे, व्ही. एम. भदाणे, अधीक्षक अभियंता, प्रमंग्रासयो, नाशिक विभाग, नाशिक, विभावरी वैद्य, अधीक्षक अभियंता, प्रमग्रासयो, अमरावती, विवेक रमेश शिंदे, कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग, मुंबई. अच्युतराव इप्पर, कक्ष अधिकारी, ग्रामविकास विभाग, मुंबई, दिनेश परदेशी, कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, सोलापूर, एस. सी. राठोड, कार्यकारी अभियंता, प्रमग्रासयो, जळगाव, व्ही. जी. बोडके, सहाय्यक लेखा अधिकारी, ग्रामविकास विभाग, मुंबई, विवेक माकुंदे, कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, नाशिक, प्रफुल्ल केळकर, कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, भंडारा, ए. डी. सगर, कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, बीड, नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, अमरावती, पी. जी. लोखंडे, कार्यकारी अभियंता, प्रमग्रासयो, चंद्रपुर, नितीन नाटक, कार्यकारी अभियंता, प्रमंग्रासयो, अकोला यांचा या अभ्यास दौऱ्यात समावेश आहे.