मुंबई (Mumbai) : पश्चिम उपनगरातून नवी मुंबईपर्यंतचा (Navi Mumbai) प्रवास आता सुसाट होणार आहे. गोरेगाव-मुलूंड जोड रस्त्यातील उड्डाण पुलाच्या कामाचे उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. गोरेगाव पश्चिम द्रुतगती मार्गापासून सुरु होऊन हा रस्ता थेट ऐरोली नाक्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे पुढे नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे.
या प्रकल्पा अंतर्गत भांडूप येथे बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार रमेश कोरगावकर, सुनिल राऊत, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. मुंबई महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मुंबईत पूर्व आणि पश्चिम पश्चिम उपनगरांना जोडणारा शेवटचा जोड रस्ता आहे. मात्र, या मार्गामुळे पश्चिम उपनगरे थेट नवी मुंबईशीही जोडली जाणार आहेत. तसेच, तेथून पुढे कल्याण डोंबिवलीपर्यंतही जाता येणार आहे.
राष्ट्रीय उद्यानात बोगदे बांधून हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. पर्यावरण रक्षण करत वनवैभव जपत शाश्वत विकासावर भर देणारा हा प्रकल्प असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला. बोगद्यामुळे जंगलातील जैवविधतेला धक्का बसणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुलूंड जोड रस्ता असा असेल -
-गोरेगांव-मुलुंड जोडरस्त्याची लांबी 12.2 किलोमीटर आहे. तर, दोन्ही बाजूला पाच मार्गिका असतील.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून 4.7 किलोमीटर लांबीचा 13 मीटर व्यासचा बोगदा आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरातून 1.60 किलोमीटर लांबीचा पेटी बोगदा आहे. हे तीन मार्गिकांचे आहेत.
-गोरेगाव बाजूकडील जोडरस्त्याचे ओबेराय मॉल ते फिल्म सिटी 2.8 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम सुरु आहे.
-'तानसा पाईप लाईन' ते 'पूर्व द्रुतगती मार्ग जंक्शन' पर्यंतच्या 2.7 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि नाहूर रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरणाचे काम सुरु असून हे काम 2022-23 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- गोरेगांव पूर्व येथील दिंडोशी न्यायालयाजवळून संतोष नगर येथील चौकापर्यंत जाणारा 1.29 किलोमीटर लांबीचा तीन मार्गिकांचा उड्डाणपूल बनविण्यात येणार आहे. या कामांमध्ये दिंडोशी न्यायालयाजवळ पादचाऱ्यांसाठी 'जीएमएलआर रस्ता ओलांडण्याकरिता स्वयंचलित सरकत्या जिन्यासह पादचारी पूल बांधण्यात येईल.
- मुलुंड खिंडीपाडा येथील गुरु गोविंद सिंग रस्ता, गोरेगांव-मुलुंड जोडरस्ता आणि खिंडीपाडा येथील भांडूप जलशुद्धीकरण संकुलाचा रस्ता यांच्या चौकातील स्थानिक वाहतुकीसाठी उच्चस्तरिय चक्रीय मार्ग प्रस्तावित आहे. तसेच या कामामध्ये खिंडीपाडा जवळील पादचाऱ्यांसाठी जीएमएलआर रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल हा स्वयंचलित सरकत्या जिन्यासह बांधण्यात येणार आहे.
-तानसा पाईप लाईन ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा तीन मार्गिकांचा 1.89 किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येईल.
-डॉक्टर हेडगेवार चौक येथे 120 मीटरचा केबल स्टे पूल बांधण्यात येईल. तर 'मुंबई मेट्रो-4' च्या खालच्या पातळीवर म्हणजे पहिल्या स्तरावर 'जीएमएलआर' उड्डाणपूल प्रस्तावित आहे. या दोन उड्डाण पुलांसाठी 666 कोटी रुपयांचा खर्च असून 36 महिन्यात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.