मुंबई (Mumbai) : नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) प्रकल्पाचा पहिल्या टप्प्यातील बेलापूर ते तळोजा-पेंधर (Belapur-Taloja-Pendhar) हा संपूर्ण ११ किलोमीटर लांबीचा नवी मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. सिडकोला (Cidco) आता या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या मुहूर्ताची प्रतीक्षा आहे.
सिडकोने बेलापूर ते खारघर या सहा किलोमीटर लांबीच्या मार्गिकेचे काम अंतिम टप्यात आणले आहे. त्याआधी खारघर ते तळोजा-पेंधर या पाच किलोमीटर मार्गिकेचे स्थापत्य, विद्युत, तसेच भारतीय रेल्वे बोर्डाच्या विविध तपासण्या होऊन सहा महिने उलटले आहेत.
सिडकोने नवी मुंबई शहर वसवताना सार्वजनिक परिवहन सेवेचा प्रथम प्रकल्प राबविला आहे. त्यामुळे ४० वर्षांपूर्वी बेस्टच्या धर्तीवर बीएमटीसी बससेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर मानखुर्द पासून पुढे वाशीपर्यंत रेल्वे सेवा कार्यान्वित व्हावी यासाठी खर्चाचा ६७ टक्के हिस्सा उचलून ती २८ वर्षांपूर्वी नवी मुंबईत आणली गेली. नवी मुंबईतील पहिल्या मेट्रो मार्गाचा ही मे २०११ मध्ये प्रारंभ करण्यात आला मात्र पहिल्या चार वर्षात सुरू होणारी ही जलद सेवा गेली चार वर्षे रखडली आहे.
देखभाल आणि संचालनसाठी महामेट्रोच्या (Mahametro) हाती हा प्रकल्प दिल्यानंतर तिला वेग आला आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या पुढाकारामुळे स्थापत्य वीज, तांत्रिक कामे आणि रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या चाचण्या यशस्वी झालेल्या खारघर ते तळोजा ही पाच किलोमीटर मार्गिका सुरू करण्याच्या तयारीत आहे; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळा जुळून येत नसल्याने या सेवेचे उद्घाटन झालेले नाही. त्यामुळे या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्या नोकरदारचे हाल होत असून, त्यांची प्रतीक्षा संपण्याचे नाव घेत नाही.
पहिल्या टप्प्यातील पहिली मार्गिका सुरू होण्यास महूर्त मिळत नाही पण याच वेळी संपूर्ण मार्गाच्या कामाने वेग घेतला असून बेलापूर ते खारघर या ६ किलोमीटर लांबीचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सिडकोच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे पहिल्या मार्गिकेची सुरुवात आणखी तीन महिने नाही झाल्यास संपूर्ण बेलापूर ते पेंधर या ११ किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाचे उद्घाटन पुढील वर्षी एकाच वेळी होण्याची शक्यता आहे.