मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. गुजरातमधील वलसाड येथील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये पहिला माउंटन बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याची एकूण लांबी 350 मीटर तर 12.6 मीटर रुंदी आणि 10.25 मीटर उंची आहे. मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडण्याचे काम हा बोगदा करतो.
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने याबाबतची माहिती दिली आहे. अवघ्या 10 महिन्यांतच हा बोगदा तयार करण्यात आला आहे. बुलेट ट्रेनने मुंबई ते अहमदाबाद प्रवासांचा वेळ 127 मिनिटांत पूर्ण होणार आहे. माउंटन बोगदा गुजरात येथील वलसाड जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील जरोली गावापासून जवळपास 1 किलोमीटर दूर आहे. हा बोगदा तयार करण्याचे काम न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथडने (NATM) केले आहे. या बोगद्याचे बांधकाम करणे खूपच खडतर होते. बोगदा बनवण्यासाठी खूप विचारपूर्व व सर्व तांत्रिक प्रक्रिया वापरुन स्फोट करण्यात आले. हा बोगदा सह्याद्री पर्वतरांगादरम्यान तयार केला आहे.
बुलेट ट्रेनच्या हा पहिल्या माउंटन बोगद्याची एकूण लांबी 350 मीटर इतकी आहे. तर 12.6 मीटर रुंदी आणि 10.25 मीटर उंच आहे. या बोगद्याचा आकार सिंगल ट्यूब हॉर्सप्रमाणे आहे. या बोगद्यात बुलेट ट्रेनचे दोन रूळ असतील. मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडण्याचे काम हा बोगदा करतो. बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गंत बांधण्यात येणाऱ्या मार्गात डोंगराळ भागात सात बोगदे असणार आहेत. तर, एक बोगदा समुद्राखाली असेल. बुलेट ट्रेनचा समुद्राखालील हा भारतातील पहिलाच बोगदा असणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाची अंदाजे किंमत 1.08 लाख कोटी इतकी आहे.
राज्यातही बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. मुंबईतील बीकेसीसह समुद्राखालील ७ किमी लांबीच्या बोगद्यासह २१ किमी लांबीच्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील बीकेसी ते ठाणेदरम्यान 21 किलोमीटरचा भूमिगत मार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग समुद्राच्या खालून तयार केला जाणार आहे. 7 किलोमीटरचा मार्ग हा 'अंडर सी टनल'चा म्हणजेच समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचा असेल.