मुंबई (Mumbai) : जानेवारी महिन्यात कार्यादेश मिळूनही मुंबई शहर भागातील रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराला (Contractor) मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने झटका दिला आहे. सर्व डिपॉझिट जप्त करून कामे काढून घेण्याचा इशारा 'रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा' या ठेकेदार कंपनीला मुंबई महापालिकेने दिला आहे.
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानंतर महापालिकेने त्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये शहर भागासाठी एक, पूर्व उपनगरासाठी एक आणि पश्चिम उपनगरांसाठी तीन अशी पाच टेंडर मागवण्यात आली होती. रस्त्यांच्या कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. ही कामे ६०७८ कोटी रुपयांची आहेत.
मुंबईतील ४०० किमी लांबीच्या २१२ रस्त्यांच्या कामांचे जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र शहर भागातील एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. शहर भागातील २६ रस्त्यांची कामे 'रोडवे सोल्यूशन इंडिया इन्फ्रा लिमिटेड' या कंपनीला देण्यात आली आहेत.
जानेवारीमध्ये रस्त्यांच्या कामांचे कार्यादेश निघाल्यानंतरही शहर विभागातील कामे अद्याप सुरू न झाल्याने महापालिकेने कंत्राटदाराला अंतिम नोटीस बजावली आहे. सर्व डिपॉझिट जप्त करून कामे काढून घेण्याचा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. या कंपनीला म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, खुलासा समाधानकारक नसल्यास दोन वर्षे कंपनीला कोणतेही काम दिले जाणार नाही, असे महापालिकेतील वरिष्ठांनी सांगितले.
हा कंत्राटदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचा असून, भाजपच्या नगरसेवकांनी वारंवार केलेल्या तक्रारीमुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पुढे येत आहे.
रस्त्यांची कामे सुरू न केल्याबद्दल पाच पैकी तीन कंत्राटदारांना महापालिकेने यापूर्वी १६ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर कामाला गती देण्याचे आश्वासन कंत्राटदारांनी महापालिकेला दिले होते. त्यानंतर कामाला फारसा वेग आलेला नाही.