मुंबई (Mumbai) : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटर रस्ते बांधण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.
योजनेत येत्या २०२४-२५ या वर्षात दहा हजार किमी रस्ते बांधण्यात येतील. उर्वरित १३ हजार कि.मी. लांबीचे रस्ते 2025-26 आणि 2026-27 या वर्षांमध्ये अनुक्रमे 6500 कि.मी. प्रती वर्ष याप्रमाणे पूर्ण करण्यात येतील. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना-२ मध्ये १० हजार कि.मी. लांबीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तसेच संशोधन व विकास अंतर्गत ७ हजार कि.मी. ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्गांची दर्जोन्नती देखील करण्यात येत आहे.
उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता
मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार असून उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. एमएमआरडीएने सादर केलेल्या पहिल्या टप्प्यात उत्तन ते विरार या जोड रस्त्यासह सागरी सेतू व दुसऱ्या टप्प्यात विरार ते पालघर सागरी सेतू मार्ग उभारण्यात येईल. या प्रकल्पासाठी घ्यावयाचे कर्ज हे वित्त मंत्रालयाच्या अटी व शर्तींच्या अधिन राहून घेण्यात येईल. यासाठीचा सुसाध्यता अहवाल व सविस्तर प्रकल्प अहवाल एमएमआरडीए तयार करेल.