मुंबई (Mumbai) : बेस्टच्या (BEST) इलेक्ट्रिक बस टेंडर प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीला (Tata Motors) मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला. टेंडर प्रक्रियेतून टाटा मोटर्स कंपनीला अपात्र ठरविण्याचा बेस्टचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवत टाटा कंपनीची मागणी फेटाळून लावली.
टाटा मोटर्सने टेंडर प्रक्रियेत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली असताना सुद्धा तांत्रिक कारणास्तव टाटा मोटर्सचे टेंडर अपात्र ठरवण्याच्या बेस्टच्या 6 मे रोजीच्या निर्णयाला कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. जेव्हा बेस्टने टेंडरचे तांत्रिक योग्यतेचे मूल्यांकन प्रकाशित केले तेव्हा त्यांनी टाटा मोटर्सची बोली तांत्रिकदृष्ट्या गैर म्हणून घोषित केली होती. टाटा मोटर्सचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय बेस्टने घेतला होता.
मुंबईकरांना प्रदूषणमुक्त व गारेगार प्रवास करता यावा यासाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. 1400 इलेक्ट्रिक बससाठी बेस्टने टेंडर काढले, मात्र टाटा कंपनीला टेंडर प्रक्रियेतून बाद करण्यात आले. आवश्यक त्या सर्व तांत्रिक पूर्तता आणि अटींचे पालन केले, पण तरीही बेस्ट प्रशासनाने तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरवल्याने टाटा कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.
बेस्टने एव्हे (EVEY) ट्रान्सला संबंधित टेंडर मंजूर केली असली तरी त्यामध्येही त्रुटी आहेत. त्यामुळे यावर आवश्यकता वाटल्यास बेस्ट नव्याने टेंडर मागवू शकते, असे खंडपीठाने स्पष्ट केले. बेस्ट बसेसच्या ताफ्यात येत्या वर्षभरात एकूण २१०० नव्या इलेक्ट्रिक बसेस दाखल होत आहेत. ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडला बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अर्थात 'बेस्ट'कडून 2100 इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचे टेंडर मिळाले आहे. 3675 कोटी इतक्या किंमतीचे हे टेंडर आहे. 'ईव्हीईवाय'ला (Evey Trans Private Limited - EVEY) बेस्टकडून लेटर ऑफ अवॉर्ड (LoA) प्राप्त झाले आहे.