मुंबई (Mumbai) : मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुंबई महापालिकेने दहिसर ते भाईंदरपर्यंत उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सुमारे ३ हजार कोटींच्या या टेंडरकडे ठेकेदारांनी सपशेल पाठ फिरवल्यामुळे तब्बल ५ वेळा या टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे.
दहिसर ते भाईंदर पूल बांधण्यासाठी महापालिकेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या मदतीने पहिल्यांदा टेंडर प्रक्रिया राबवली, तेव्हा केवळ एकाच कंत्राटदाराने टेंडर भरले. ज्या कंत्राटदाराने हे टेंडर भरले त्याने महापालिकेच्या यापूर्वीच्या प्रकल्पांमध्येही काम केले होते. मात्र, महापालिकेने हे पहिले टेंडर रद्द केले. पहिल्या टेंडर प्रक्रियेत ज्या कंत्राटदाराने टेंडर भरले, त्याला हे काम मिळू नये, म्हणून टेंडर रद्द केल्याचा आरोप झाला होता. २८ फेब्रुवारीमध्ये पहिल्यांदा टेंडर काढले. त्यावेळी प्रकल्पाची किंमत १,५०० कोटी रुपये एवढी होती. तांत्रिक कारण दाखवून पहिली टेंडर प्रक्रिया रद्द केली आणि १० ऑक्टोबर रोजी दुसऱ्यांदा टेंडर काढण्यात आले. आता या कामाची किंमत सुमारे ३ हजार कोटी इतकी झाली. मात्र, कोस्टल रोड आणि दहिसर ते भाईंदर पूल हे दोन प्रकल्प जोडले जात असल्याने कामाचे स्वरूप बदलले, त्यामुळे किंमतीत वाढ झाल्याचे स्पष्टीकरण महापालिकेने दिले आहे. मधल्या काळात तब्बल पाच वेळा या टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र ठेकेदारांनी याकडे पाठ फिरवली आहे. बुधवार, ७ जूनपर्यंत टेंडर भरता येणार आहे.
दहिसर चेक नाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच रस्ता आहे. त्यामुळे मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या दहिसर चेक नाक्यावर नेहमीच ट्रॅफिक जाम होते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहिसर ते भाईंदरपर्यंत असा ५ किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या दहिसर ते भाईंदरपर्यंतच्या प्रवासाला किमान पाऊण तास लागतो. उन्नत मार्गामुळे हे अंतर फक्त दहा मिनिटात कापता येणार आहे.