मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेचे (Mumbai Municipal Corporation) कंत्राट निघाले अन् ते ठेकेदाराने हातातून जाऊ दिले असे होणे शक्यच नसल्याचे समोर आले आहे. काहीही करा पण कंत्राट द्या, या मंत्रानुसार अंदाजपत्रकापेक्षा कमी दराने कंत्राट (Contract) मिळवण्याच्या पद्धतीवर संशय घेतला जात आहे. महापालिकेने उद्यानाच्या विकासासाठी मागविलेल्या टेंडरमध्ये (Tender) 36.70 टक्के कमी दराने आलेले टेंडर रद्द केले. त्यानंतर याच कामासाठी फेरटेंडर मागवून 31.05 टक्के कमी दराने काम देण्याची तयारी केली.
महानगर पालिकेने आग्रीपाडा येथे बेबी पार्क तयार करण्यासाठी टेंडर मागविले होते. त्यासाठी पालिकेने 2 कोटी 49 लाख 4 हजार रुपयांचा अंदाजपत्र तयार केले होते. मात्र, कंत्राटदाराने तब्बल 36.70 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली. त्यावर प्रशासनाने या कंत्राटदाराला (Contractor) दरांचे विश्लेषण करण्याचे निर्देश दिले. मात्र, हे विश्लेषण सध्याच्या बाजारभावाला धरुन नसल्याने पालिकेने हे टेंडर रद्द केले. त्यानंतर पालिकेने पुन्हा याच कामासाठी फेरटेंडर मागविले. त्यात कंत्राटदाराने 31.05 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. त्यानुसार पालिकेने हा प्रस्ताव मंगळवारी (ता.9) होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
महानगर पालिकेने काही महिन्यांपूर्वी रस्ते दुरुस्तीसाठी 1200 कोटी रुपयांचे टेंडर काढले होते. त्यात, कंत्राटदारांनी 40 टक्के कमी दराने टेंडर भरल्याची माहिती भाजपने उघड केली होती. पालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतलाच त्याच बरोबर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्र लिहून आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर पालिकेने हे टेंडरही रद्द करुन नवे टेंडर मागविले आहेत.
ज्या कंत्राटदाराने पहिल्या टेंडरमध्ये 36.70 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली होती. त्याच कंत्राटदाराने फेरटेंडर मागवल्यावर पुन्हा टेंडर भरले होते. यात त्याने 29.50 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली.