मुंबई (Mumbai) : कंत्राटदार मुंबई महापालिकेवर भलतेच खूश झाले आहेत. महानगर पालिकेच्या अंदाजापेक्षा 30 टक्के कमी दराने काम करण्याचा सपाटाच कंत्राटदारांनी लावला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत असेच 30 टक्के कमी दराने काम करण्याचे तीन प्रस्ताव प्रशासनाने मांडले आहेत. सध्याच्या नव्हे तर 2018 च्या बाजारभावापेक्षा 30 टक्के कमी दराने कंत्राटदार काम करणार आहेत. त्यामुळे कामाचा दर्जा काय राहणार याचा केवळ विचारच केलेला बरा..
पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली आदी ठिकाणच्या 36 भागांमध्ये जलवाहिन्यांचे नवीन जाळे पसरविले जाणार आहे. तसेच जुन्या जलवाहिन्या बदलण्यात येतील. याकामासाठी महापालिकेने पाच कोटी 25 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. मात्र, कंत्राटदारांनी 30 टक्के कमी दरात 4 कोटी 67 लाखात हे काम करण्याची तयारी दाखवली आहे. हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडला आहे.
अशाच पध्दतीने पूर्व उपनगरातील चेंबूर येथील आरसीएफ परिसरातील नाल्याची जोडणी करण्याबरोबर इतर कामे करण्यासाठी 9 कोटी 76 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. संबंधित कंत्राटदाराने 34.24 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. आता हे काम 7 कोटी रुपयांत होणार आहे. तर, चारकोप तलावाच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेने 8 कोटी 18 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. येथेही कंत्राटदाराने 31.59 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दाखवली आहे. हे काम आता 6 कोटी 38 लाख रुपयांत होणार आहे. हे तिन्ही प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडले आहेत. यापूर्वी 10 ते 15 टक्के कमी दराने कामे करण्याची तयारी कंत्राटदार दाखवत होते. मात्र, गेल्या काही वर्षात कंत्राटदार महापालिकेवर मेहरबान झाले असून 30 टक्के कमी दराने कामे होण्याचा सपाटाच सुरु आहे.
2018 नुसार अंदाजपत्रक
महापालिकेने या तिन्ही कामासाठी 2018 च्या दरानुसार अंदाजपत्र तयार केले होते. गेल्या काही महिन्यात बांधकामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, महापालिकेच्या कंत्राटदारांना कोणत्याही भाववाढीची चिंता नाही, असे दिसते. सध्याच्या बाजारभावापेक्षा नव्हे तर 2018 च्या दराच्या 30 टक्के कमी दराने कंत्राटदार काम करत आहे. त्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्न निर्माण होत आहे.