मुंबई (Mumbai) : टेंडर नाही, कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. तरीपण कल्याण डोंबिवली महापालिकेच्या एका मैदानावर दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. टेंडर काढण्यापूर्वीच हे काम सुरु करण्यात आल्याने त्याची तक्रार झाली आहे. महापालिकेने संबंधित खोदकाम करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे. ठेकेदाराच्या या कारनाम्यामुळे प्रशासनही अवाक् झाले आहे.
कल्याण शहराच्या पश्चिम भागातील फडके मैदानाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे टेंडर काढण्याआधीच ठेकेदाराने काम सुरु केले आहे. फडके मैदानाच्या देखभाल दुरुस्ती आणि नूतनीकरणाच्या कामाचे ७५ लाखाचे टेंडर प्रस्तावित आहे. मात्र शिक्षक मतदार संघाची निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू होती. आचार संहितेमुळे या कामाचे टेंडर काढण्यात आलेले नव्हते. चालू महिन्यात हे टेंडर काढले जाणार होते. मनसेचे पदाधिकारी गणेश लांडगे यांनी महापालिका प्रशासनाकडे याप्रकरणी तक्रार केली. या तक्रारीची कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
कोरे यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार अर्ज दिला आहे. टेंडर काढलेले नसताना काम सुरु करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी या प्रकरणी महापालिका मुख्यालयात घाव घेतली. टेंडर काढलेली नसताना काम कशाच्या आधारे सुरु केले असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रशासनाला याप्रकरणी जाब विचारला असून महापालिकेत अनेक विकास कामे रखडलेली आहे. त्या विकास कामांचीही टेंडर काढण्याऐवजी कामे सुरु करावीत, असा उपरोधिक टोला प्रशासनाला दिला आहे.