मुंबई (Mumbai) : बेस्ट शेल्टर्सवरील जाहिरातदार नेमण्यासाठी काढलेल्या टेंडरसाठी सर्वाधिक २४६५ कोटींची बोली लावणाऱ्या प्रो ऍक्टीव्ह इन ऍण्ड आऊट एडव्हर्टायजिंग प्रा. लि. कंपनीवर टेंडर मागे घेण्यासाठी दबाव असून, ही टेंडर प्रक्रिया रखडल्याने बेस्टचे सुमारे ५ हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा आरोप मुंबई महापालिकेतील कॉंग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी केला आहे. ही बाब कॉंग्रेसने आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
बेस्ट उपक्रमाने २० वर्षांच्या कालावधीसाठी शेल्टर्सची टेंडर प्रक्रिया सुरु केली. परंतु या टेंडर प्रक्रियेच्या अंमलबजावणीत दिरंगाई होत असल्याने बेस्ट उपक्रमाचे कोट्यावधीचे नुकसान होत असल्याची बाब कॉंग्रेसने निदर्शनास आणली आहे. या शेल्टरवर लागणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातून उपक्रमाला चांगला महसूल मिळत असतो. पण शेल्टर्सवर जाहिरातदाराची नेमणूक करण्यासाठीची टेंडर प्रक्रिया रखडल्याने बेस्टचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. तब्बल २१ दिवस उलटूनही बेस्ट उपक्रम टेंडरद्वारे कंपनीची नेमणूक करण्यासाठी असमर्थ ठरल्याचे कॉंग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे बेस्टच्या महसूलातील ५ हजार कोटी वाचवा असे पत्र रवी राजा यांनी आयुक्तांना लिहिले आहे.
बेस्टने एप्रिल महिन्यात बस स्टॉप शेल्टर्सवर जाहिरात देण्यासाठीची कंपनी नेमण्याची टेंडर प्रक्रिया सुरु केली. यासाठी मे महिन्यात टेंडरपूर्व बैठकही झाली. या टेंडर प्रक्रियेत पहिल्या कंपनीने टेंडर प्रक्रियेतून बाहेर पडावे म्हणून दबाव आणत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. या टेंडर प्रक्रियेत चार कंत्राटदारांनी बोली लावली होती. त्यामध्ये प्रो ऍक्टीव्ह इन एण्ड आऊट एडव्हर्टायजिंग प्रा. लि. ने २४६५ कोटी रुपयांची बोली लावली. त्यापाठोपाठ साईनपोस्ट इंडिया प्रा. लि ने ८६१ कोटींची बोली लावली. पृथ्वी आऊटडोअर पब्लिसिटी एलएलपी ५३८ कोटी, प्रकाश आर्ट्स पीटीव्ही लिमिटेड ४४० कोटी अशी बोली लावली होती. पण पहिल्या कंपनीला अर्ज मागे घेण्यासाठी दबाव असल्याचा आरोप रवी राजा यांनी केला आहे. यामुळे १६०० कोटी रुपयांचे नुकसान बेस्ट उपक्रमाचे होईल असे राजा यांचा म्हणणे आहे. या विषयावर तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे राजा यांनी सांगितले.
सध्या बेस्टचे चेअरमन आणि समितीही नाही. त्यामुळेच बेस्ट उपक्रमाला मिळणारा १६०० कोटी रुपयांचा महसूल आता अडचणीत आल्याचे राजा म्हणाले. म्हणूनच हे पत्र मुंबईचे महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पाठवत असून येत्या तीन वर्षातील ५ हजार कोटी रुपयांचा बेस्ट उपक्रमाचा महसूल वाचवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्यामुळेच बेस्टचे महाव्यवस्थापक आणि महानगरपालिका आयुक्त हा महसूल वाचवतील असा विश्वास असल्याचे राजा यांनी सांगितले. बेस्ट उपक्रम सध्या अडचणीत असून २२३६ कोटी रूपयांची तूट २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात दाखवण्यात आली आहे. त्यामध्ये एकट्या वाहतूक विभागाची तूट ही २२१० कोटी रूपये इतकी आहे.