मुंबई (Mumbai) : राज्यातील शिंदे प्रणित भाजपा सरकारने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आता या सरकारने सुतळी खरेदीमध्येही भ्रष्टाचार केला आहे. बाजारात ७२ रुपये किलो दराने मिळणारी सुतळी या सरकारने ४१० रुपये किलो दराने खरेदी करुन कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, किमती वाढवून टेंडर देण्यासाठी निर्मल भवनमध्ये लुटारु बसले आहेत. काही दिवसांपूर्वी सरकारने एक टेंडर काढले. शेतमाल विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यासाठी सुतळी लागते. त्यासाठी दोन कोटी लागत होते. परंतु सरकारने 35 कोटी रुपयांची खरेदी दाखवली म्हणजे दोन कोटींसाठी 35 कोटींचा भ्रष्टाचार केला. राज्यातील जनतेच्या घामाचे पैसे लुटले जात आहेत. हे जनतेच्या घामाच्या पैशाची दिवसाढवळ्या लुट सुरु आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, ड्रग माफिया, दरोडेखोर, महिला अत्याचार वाढले आहेत पण सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत आहे असेही नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्रातील मोठे उद्योग राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. आता मुंबईतील मोठ्या हिरे उद्योगासह इतर उर्वरित उद्योगही सुरतला घेऊन जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. मागील दीड वर्षात राज्यातील भाजपा सरकार दिल्लीच्या आदेशानुसार महाराष्ट्राची लूट करत आहे. सुरतमध्ये मोठा हिरे उद्योग उभा केला जात आहे, त्यासाठी मुंबईतील हिरे उद्योगही सुरतला नेण्यासाठी तसेच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही मार्गी लागावे यासाठी पंतप्रधान मोदी आले आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्प हा महाराष्ट्रावर मोठे ओझे आहे पण मोदी-शहा समोर शिंदे-फडणवीस-पवार काहीच बोलू शकत नाहीत. मुंबई व महाराष्ट्रातील उद्योग, महत्वाची कार्यालये, संस्था मुंबई, महाराष्ट्राबाहेर घेऊन जाण्याचा सपाटा भाजपाने लावलेला आहे. राज्याला रसातळाला घालवण्याचे पाप भाजपा सरकार करत आहे, अशी टीका पटोले यांनी केली आहे.