मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Bullet Train) वांद्रे कुर्ला संकुल येथील स्टेशनच्या डिझाईन आणि बांधकामासाठी कमर्शियल बिड खुले करण्यात आले. टेक्निकल बिडमध्ये पात्र ३ बोलीदारांच्या कमर्शियल बिड नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्यावतीने उघडण्यात आल्या. या १८०० कोटींच्या टेंडरसाठी मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड संयुक्त उपक्रम तसेच एमईआय एलएचसीसी संयुक्त उपक्रम या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.
पॅकेज सी-1 अंतर्गत बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील भूमिगत स्थानकाकरिता 467 मीटर लांबीच्या कट आणि कव्हर पद्धतीच्या स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी तसेच 66 मीटरच्या टनेल वेंटिलेशन शाफ्टसाठी आरेखन व निर्मितीसाठी टेंडर मागविण्यात आले होते. वांद्रे-कुर्ला संकुल येथे भूमिगत स्थानक होणार आहे. त्याच्या उभारणीसाठी एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे स्थानक ४.९ हेक्टर जागेत उभारले जाणार असून १६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट उभारण्यात येणार आहेत. प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भूमिगत स्थानक असणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील अहमदाबाद ते वापी ३५० किलोमीटरचा मार्ग २०२७ किंवा २०२८ मध्ये पूर्ण होऊन तो सेवेत येईल. त्याआधी या टप्प्यातील सुरत ते बिलिमोरा मार्ग २०२६ पर्यंत सेवेत आणण्याचे उद्धिष्ट आहे. महाराष्ट्रातील ९८ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. हे संपूर्ण भूसंपादन केल्यानंतर प्रकल्पाची अंतिम मुदत निश्चित होईल. सध्या सुरतमध्ये बुलेट ट्रेनचे स्थानक, उन्नत मार्गिकेसाठी गर्डर बसविण्याचा कामांना वेग दिला जात असून विविध कामांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली आहे. याशिवाय प्रकल्पात येणाऱ्या सात नद्यांवर पूलही बांधण्यात येणार आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्प गुजरात, दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्रातून जाणार आहे. कमर्शियल बिडमुळे आता वांद्रे कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती मिळेल. या टेंडरमध्ये मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड आणि हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड संयुक्त उपक्रम तसेच एमईआय एलएचसीसी संयुक्त उपक्रम यांनी सर्वात कमी बोली लावली. तर या संदर्भातील टेक्निकल बिड 4 नोव्हेंबर 2022 रोजी खुल्या केल्या होत्या, असे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्या सुषमा गौर यांनी सांगितले. त्यामुळे वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी स्टेशन उभारणीच्या कामासाठी लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. एकूण ५०८ किमी लांबीच्या कॉरिडॉरमध्ये मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती येथे बुलेट ट्रेनची स्थानके असतील.