प्रगत तंत्रज्ञानाद्वारे गोखले पुलाचे काम पूर्ण करा : मुख्यमंत्री

Eknath Shinde
Eknath ShindeTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पुलावरील फेरीवाले हटवून येथील वाहतुकीचे योग्य नियमन करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून गोखले पुलाचे बांधकाम वेळेआधी पूर्ण करण्याची सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे.

Eknath Shinde
मुंबईत २२०० कोटींच्या रस्त्यांच्या कामावर 'व्हिजिलन्स'ची करडी नजर

अंधेरीतील गोखले पूल हा धोकादायक झाल्याने वाहतूक पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे. या निर्णयाची कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने अंधेरी पूर्व आणि पश्चिम दोन्ही दिशेला राहणाऱ्या नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. हा विषय मुख्यमंत्र्यांना समजल्यावर त्यांनी याची तातडीने दखल घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचे निर्देश दिले आहेत. हा पूल बंद झाल्यामुळे अंधेरी पश्चिमेकडील एस व्ही रोड, लिंक रोड, जे पी रोड, इर्ला जंक्शन, शॉपर्स स्टॉप येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. तसेच हा पूल बंद केल्यानंतर वाहतूक पोलिसांनी करायची नवीन सिग्नल यंत्रणा देखील वाहतूक पोलिसांनी कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे अंधेरी शहरात पूर्व आणि पश्चिम आशा दोन्ही दिशेला अभूतपूर्व वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करून नागरिकांना दिलासा द्यावा असे निर्देश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबलसिंह चहल याना दिले आहेत. अंधेरी स्टेशन आणि मेट्रो स्थानकाच्या जवळ मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसत असल्याने आधीच वाढलेल्या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे जोपर्यंत पुलाचे काम होत नाही तोवर हे फेरीवाले हटवून रस्ता मोकळा ठेवावा असे स्पष्ट आदेशच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई मनपा आयुक्तांना दिले आहेत.

Eknath Shinde
मुंबईतील गोखले पूल वाहतुकीस बंद; या सहा मार्गांद्वारे वाहतूक वळवली

त्यासोबतच रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून गोखले पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामाला प्राथमिकता देऊन तो लवकरात लवकर आणि शक्य झाल्यास वेळेआधी पूर्ण करावा आशा सूचना देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यासाठी गरज पडल्यास प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल बांधावा असेही शिंदे यांनी सांगितले आहे. या कामाचा कोणताही त्रास नागरिकांना होणार नाही तसेच वाहतुकीचे नियमन सुरळीत व्हावे यासाठी लागणाऱ्या साऱ्या उपाययोजना तातडीने कराव्यात असे मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com