मुंबई (Mumbai) : ठाणे शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. विविध महत्त्वाचे प्रकल्प उभे राहत आहेत, त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे शहरात 'सीएमओ' कार्यालय साकारत आहे. ठाणे महापालिकेने या अनुषंगाने फर्निचर खरेदीसाठी सुमारे साडेचार कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या टेंडरमध्ये 'मुख्यमंत्री कार्यालय' असा स्पष्ट उल्लेख आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचे आता कोपरी- पाचपाखाडी मतदारसंघातील वागळे इस्टेट येथील कशिश पार्क भागात नवीन कार्यालय उभे राहणार आहे. या कार्यालयामुळे शिंदे यांची नजर थेट महापालिकेच्या कारभारावर आणि शहरावर राहणार आहे. याच कार्यालयाच्या इमारतीत ठाणे महापालिका आयुक्त आणि शासकीय कृषी विभागाचे कार्यालयही असणार आहे.
वागळे इस्टेट येथे असलेल्या शासकीय कृषी विभागाच्या कार्यालयाची जागा क्लस्टर नियोजनासाठी वापरण्यात येणार असल्याने तात्पुरते कृषी विभागाचे कार्यालय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या इमारतीतच राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या नगर अभियंता यांच्या वतीने बांधकाम व फर्निचरची मुख्यमंत्र्यांसह कृषी विभागाचे कार्यालय आणि महापालिका आयुक्त कार्यालयाचे बांधकाम, विद्युतीकरण आणि संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी ४ कोटी ६० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले आहे. ३ मे, दुपारी ४ वाजेपर्यंत टेंडर भरता येणार असून ते ८ मे रोजी उघडले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यातील लुईसवाडी येथे शुभदीप हे निवासस्थान आहे, सध्या त्यांच्या या निवासस्थानाला कार्यालयाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.