नागपूर (Nagpur) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव असलेल्या महामार्गावरून जाण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार असून सर्वांसाठी हा आनंदाचा दिवस असेल. नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा मार्ग सुरू होईल. त्यामुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात आला असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. या महामार्गामुळे मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येतील, उद्योगधंदे वाढतील. शेतकऱ्यांनाही दळणवळणास मदत होईल. अत्यंत महत्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प या भागाला समृद्धी देणारा आहे. आमच्या सरकारचा सर्वांनाच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई-पुणे हा देशातील पहिला ॲक्सेस कंट्रोल असलेला महामार्ग आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला होता, अशी आठवणही मुख्यमंत्र्यांनी सांगितली.
असा आहे समृद्धी महामार्ग
एकूण लांबी : ७०१ किमी
जिल्हे : १०
तालुके : २६
गावे : ३९२
नागपूर-मुंबई प्रवास : ८ तास
समृद्धीचा प्रवास
- ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
-२०१६-१७ मध्ये २४ हजार शेतकऱ्यांकडून ८ हजार ८०० हेक्टर जमिनीचे संपादन
- जानेवारी २०१८ मध्ये पहिली निविदा
- नोव्हेंबर २०१८ ला काम सुरू करण्याचे आदेश
- १४ जानेवारी २०१९ अमरावतीपर्यंत काम वेगाने
हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पाहणी केली. नागपूर ते शिर्डीपर्यंत मार्गाची पाहणी करताना मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. फडणवीसांच्या वेगवान ड्रायव्हिंगने मुख्यमंत्र्यांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. शिर्डीपर्यंत प्रवास करताना दोघांचेही ठिकठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. तर, जालना तालुक्यात किसान काँग्रेसने काळे झेंडे दाखविले.
पाहणी दौरा
५२९ किमी : नागपूर-शिर्डी अंतर
५ तास : प्रवासासाठी लागलेला वेळ