मुंबई (Mumbai) : सिडकोने दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रसिद्ध केलेल्या योजनेसाठी विक्रमी ६८ हजार हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. या सोडतीत नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी ही घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या 11 नोव्हेंबर पर्यंत या घरांसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
सिडकोकडून तब्बल 26,000 घरांची महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' या नावाने ही महागृहनिर्माण योजना जाहीर करण्यात आली आहे. योजनेच्या नावानुसार अर्जदारांना सदनिकांकरिता पसंतीक्रम देण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
सिडको प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईच्या विविध उपनगरांमध्ये 67,000 घरे बांधत आहे. पहिल्या टप्प्यातील 26,000 घरे आता खरेदीदारांसाठी खुली आहेत. त्यापैकी तळोजा येथे सुमारे 13,000 घरे आहेत. तथापि, अपुरा पाणीपुरवठा, वायू प्रदूषण आणि मेट्रोशिवाय मर्यादित वाहतुकीचे पर्याय यासारख्या समस्यांमुळे तळोजातील घरांना मिळणारा प्रतिसाद कमी आहे.
ही घरे ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) संकल्पनेवर आधारित आहेत, जी रेल्वे स्टेशन, बस स्टॉप आणि मेट्रो स्टेशनच्या जवळ आहेत. कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे सिडकोला मोठ्या संख्येने अर्ज येण्याची अपेक्षा आहे. योजनेच्या पहिल्या दिवशी 12,400 इतक्या सर्वाधिक अर्जांची नोंदणी झाली आहे.
योजनेअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) अंतर्गत अनुदानाच्या अतिरिक्त लाभासह ही घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि अल्प उत्पन्न गट (LIG) गटांसाठी उपलब्ध आहे.
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील ही घरे नवी मुंबईतील खारघर, खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसर, मानसरोवर, पनवेल, तळोजा आणि उलवे नोडमध्ये आहेत. मात्र, या घरांच्या किमती अद्याप जाहीर न केल्याने खरेदीदार संभ्रमात आहेत.