मुंबई (Mumbai) : प्रिकास्ट तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिडकोने नवी मुंबईतील बामनडाेंगरी रेल्वे स्थानकाजवळ अवघ्या ९६ दिवसांत ९६ सदनिका बांधून पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेले गृहनिर्मितीचे प्रकल्प वेगवान व्हावेत यासाठी सिडकोला या तंत्रज्ञानाचा मोठा आधार ठरत आहे.
येत्या काळात सिडकोच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबईत हजारो घरे बांधली जाणार आहेत. सिडकोने परिवहन केंद्रित विकास संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या काळात ६८ हजार घरांची निर्मित्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. महारेरा कायद्यानुसार निर्धारित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ९६ हा उपक्रम राबविला. त्यासाठी प्रिकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ५ एप्रिल २०२२ रोजी या इमारतीचे काम सुरु केले होते. ते ९ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले.
प्रिकास्ट तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये -
- प्रिकास्ट तंत्रज्ञान हे भविष्यात सर्वोत्तम गुणवत्तेसह नियंत्रित वातावरणात यांत्रिक पद्धतीने निवासी इमारतींचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते.
- पूर्ण केलेल्या बांधकाम प्रकल्पात वास्तुशास्त्रीय दृष्ट्या परिपूर्णता करण्यासह अधिसंरचनेच्या १९८५ प्रिकास्ट घटकांचे उत्पादन आणि इन्स्टॉलेशन करणे आदींचा समावेश होता.
- ६४ हजार चौ. फूट बांधकाम क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम आदी कामांचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठीसुद्धा डिजिटल तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे.