मुंबई (Mumbai) : मध्य रेल्वेने (Central Railway) शुद्ध पाणी मिळविण्यासाठी हवेतून पाण्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील सीएसएमटी, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे आणि विक्रोळी या सहा रेल्वे स्थानकांत पाण्याची निर्मिती करणारी 17 यंत्रे लावण्यात येणार आहेत. यातून प्रवाशांना शुद्ध पाणी आणि रेल्वेला आर्थिक महसूल मिळणार आहे. तसेच 34 स्थानकांत वॉटर व्हेंडिंग यंत्रांची सुविधा देण्याचाही निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
प्रवासादरम्यान प्रवाशांना रेल्वे स्थानकातील स्टॉल्सवर खाद्यपदार्थ आणि बाटलीबंद पाणी मिळते. मात्र आयआरसीटीसीमार्फत लावण्यात आलेल्या वॉटर व्हेंडिंग मशिन्स सध्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनानेच 34 स्थानकांत वॉटर व्हेंडिंग यंत्रांची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मध्य रेल्वेने आता हवेतून पाण्याची निर्मिती होऊन पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणार्याही मशिन्स बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या मशिनमधून शुद्ध पाणी मिळण्यासाठी त्यावर अनेक प्रक्रिया करण्यात येणार आहेत. मशिनमध्ये पाण्यातील दूषित घटकांना बाजूला काढण्यासाठी हवा फिल्टर केली जाईल. फिल्टर केलेली हवा मशिनच्या कूलिंग चेंबरमधून जाऊन हवा घनरूप होईल. घनरूप हवा पाण्यात रुपांतरित होईल. त्यातून मिळालेल्या पाण्याची साठवण टाकीमध्ये केली जाणार आहे. अशा सर्व प्रक्रियेनंतर हवेतून शुद्ध पाणी मिळणार आहे.