मुंबई (Mumbai) : ब्रिटिशकालीन कल्याण स्थानकाचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे. तसेच लोकल व लांबपल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र रेल्वेमार्गिका उभारण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे पुढील २ ते ३ वर्षांत या विकासकामांवर सुमारे ९०० कोटी इतका खर्च करणार आहे.
कल्याण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील आणि ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर आहे. कल्याण जंक्शन हे मुंबई-कल्याण मध्य रेल्वेवरील मोठे स्थानक आहे. तब्बल १६९ वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात बांधलेल्या कल्याण टर्मिनस स्थानकाचे रुपडे आता बदलणार आहे. कल्याण स्थानकावर नाशिककडे व पुण्याकडे जाणार्या लांबपल्ल्याच्या गाड्यांचाही थांबा असतो. शिवाय स्थानिक रेल्वेच्या रुळांचेही काम आहे, जे मध्य रेल्वे पुढील दोन-तीन वर्षांत म्हणजे साधारणपणे २०२५-२६ पर्यंत पूर्ण करणार आहे. यात मध्य रेल्वेकडून अनेक सुखसोयींनी युक्त अशी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत व त्यासाठी ९०० कोटी इतका अंदाजे खर्च येणार आहे. सध्या लांबपल्ल्याच्या गाड्या व लोकल रेल्वेचे मार्ग हे वेगवेगळे करण्यात येणार असल्याने मोठा विलंब टळणार आहे.
सध्या ८५० गाड्यांहून अधिक रेल्वेगाड्या कल्याण स्थानक टर्मिनसमधून रोज बाहेर पडतात. कल्याण टर्मिनस स्थानक १८५४ मध्ये बांधले गेल्यानंतर लांबपल्ल्याच्या व लोकल गाड्यांचे रुळ एकत्रच वापरले जात आहेत. आता लवकरच नव्या कामाला सुरुवात होणार आहे व गूड्स यार्डमधील कल्याण पूर्वेकडील भागातील सुमारे ३२ रुळ उखडून टाकण्यात येणार आहेत. या पूर्वेकडील भागावर टर्मिनस, रेल्वे ऑफिस इमारत, रिटेल कामासाठी, कमर्शिअल इमारत आणि बहुस्तरीय कार पार्किंग बांधले जाणार आहे. उखडल्या जाणार्या ३२ रुळांपैकी १२ रुळ गूड्स यार्ड कामाकरिता वापरले जातील व सहा रेल्वेमार्ग टर्मिनस व प्लॅटफॉर्मसाठी वापरले जातील. या टर्मिनस इमारतीवरच्या जागेत फूट ओव्हर ब्रिजेस, रोड ओव्हरब्रिजेस आणि ट्रॅव्हलेटर्सची मदत घेऊन लोकल गाड्यांना जोडणारे अत्याधुनिक टर्मिनस बांधले जाणार आहे. ही सुमारे अर्धा किमी लांब टर्मिनस इमारत सर्व लोकल गाड्यांच्या प्लॅटफॉर्मना जोडेल.
कल्याण पूर्वेकडील यार्डाच्या ठिकाणी बहुस्तरीय वाहनतळ बांधल्यावर तेथे २५०० हून अधिक दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करता येतील. कल्याण स्थानकावर नव्याने ५.६५ लाख प्रवासी सामावून घेण्याची क्षमता तयार होईल. सध्या ही संख्या फक्त ३.७२ लाख इतकी आहे.