मुंबई (Mumbai) : मुंबईतील सर्वात जुन्या पुलांपैकी एक असलेला मस्जिद स्थानकाशेजारील कर्नाक ब्रिज धोकादायक ठरल्याने हा पूल पाडण्याच्या प्रक्रियेस मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. या ब्रिजचा डेब्रिज हटविण्यासाठी रविवारी ब्लॉक आणि नाईट ब्लॉकमध्ये तीन महिने काम चालणार आहे. त्यानंतर ब्रिजचा लोखंडी सांगाडा उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी डिसेंबर महिन्यांत 30 तासांचा पॉवरब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिका येथे नवा पूल बांधणार आहे.
मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकाजवळील हँकॉक ब्रिज नव्याने बांधून पूर्ण करण्यात आल्याने आता मध्य रेल्वेने मस्जिद स्टेशनजवळील शंभर वर्षांहून अधिक जुन्या कर्नाक ब्रिजवर हातोडा टाकण्याचे काम सुरु केले आहे. हा पूल सात स्पॅनचा आहे. इंग्रजी आद्याक्षर 'आय' आकाराच्या गर्डर बीमवर एम.एस.प्लेट सह हा ब्रिज तरला आहे. या पुलाचा संपूर्ण भार गर्डरवर स्ट्रान्सफर होत नंतर खांबाद्वारे बेअरिंगवर आणि शेवटी पायावर जात आहे. या पुलाचे मेन गर्डर व क्रॉस गर्डर संपूर्णपणे गंजले आहेत.
दोन्ही टोकांना जमिनीवरचे त्यांचे जोडही पूर्णपणे खराब झाले आहेत. लोकल वाहतुकीला बाधा न आणता रविवारचे आणि रात्रीचे छोटे ब्लॉक घेऊन पाडकाम सुरु केले असून तीन महिन्यांनंतर मोठा 30 तासांचा ट्रॅफीक व पॉवर ब्लॉक घेऊन या पुलाचा सांगाडा उचलण्यात येणार आहे.