मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (BMC) प्रशासकांनी २५ कोटी रुपयांच्या वाढीव किंमतीच्या संगणक खरेदीचे टेंडर (Tender) तातडीने रद्द करून ही खरेदी जीईएम पोर्टलद्वारे करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. हे टेंडर विशिष्ट ठेकेदारांना मिळावे यासाठी प्रशासनाने या टेंडरमध्ये जाणीवपूर्वक संबंधित कंपनीस अनुकूल अटी व शर्थी टाकल्या आहेत, असाही आरोप करण्यात आला आहे.
महापालिकेच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या खरेदीत काही ठराविक ठेकेदारांनी मक्तेदारी केली आहे. फक्त तेच या टेंडरसाठी पात्र असतात असा आरोप भाजपने केला आहे. डायनाकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेड हा संगणक हार्डवेअरच्या पुरवठ्यासाठी असाच एक प्राधान्य असलेला ठेकेदार आहे, असाही भाजपचा आरोप आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेच्या आयटी विभागाच्या सगळ्या टेंडरपैकी 80 टक्के टेंडर एकाच कंपनीला मिळाले आहेत.
आयटी विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील संगनमतातून प्रस्तावित 25 कोटी रुपयांच्या संगणक खरेदीसाठी महापालिकेने 2018-19 या आर्थिक वर्षासाठी 100 कोटी रुपयांच्या उलाढालीची अट टेंडरमध्ये घातली आहे. या अटी सीवीसी नियमांचे आणि एसबीडीच्या निर्देशांचे स्पष्ट उल्लंघन आहेत. संबंधित कंपनी 85 हजार रुपयाला हे कॉम्प्यूटर देणार आहे. त्याची बाजारपेठेतील किंमत कमी आहे. त्यामुळे या खरेदीत मोठा घोटाळा होऊ शकतो. म्हणून हे टेंडर महापालिकेने थांबवावे, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी केली आहे.