Mumbai News मुंबई : मुंबई महापालिकेने (BMC) वांद्रे पश्चिम भागातील रंगशारदा परिसरातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी मागवलेले १०० कोटींचे टेंडर (Tender) वादात सापडले आहे.
या टेंडरसाठी महापालिकेने विशिष्ट अटी घातल्या आहेत, जेणेकरून दोन ते तीनच कंपन्या यात पात्र होत आहेत. महापालिका अधिकारी आणि ठेकेदार कंपन्यांच्या संगनमताने हा घोटाळा होत असल्याने याची चौकशी केली जावी, अशी मागणी शिवसेना (उबाठा) आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी केली आहे.
सुनील प्रभू यांनी मुंबईतील रस्त्यांचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. यावेळी ते म्हणाले होते की, मुंबई महानगरपालिकेने २०२२ मध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ६००० कोटींची टेंडर काढली असून त्यापैकी आतापर्यंत फक्त २५ टक्के कामे झालेली आहेत.
तसेच शहर भागातील रस्ते कामांचे टेंडर रद्द करण्यात आले. आता महापालिकेने पुन्हा शहर आणि उपनगरातील रस्त्यांच्या कामांसाठी दुसऱ्या टप्प्यात ६५०० कोटी रुपयांचे टेंडर मागवले असून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने यासाठीचे कार्यदिश जारी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मोठी टेंडर मागवून ती महापालिकेच्या अंदाजित दरातच अर्थात ऍटपार दरात बोलीदारांकडून काम करून घेतले जाते, ज्यामुळे महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या एवढ्या मोठ्या पॅकेजचे टेंडर मागवण्यात आल्याने तसेच यापूर्वी उणे दराने बोली लावून काम मिळवणारे कंत्राटदार कंपन्यांना आता अंदाजित दरात रस्त्यांची कामे देण्यात आल्याने महापालिकेच्या तिजोरीवरच सुमारे २५०० ते ३००० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडला आहे. तसेच जास्त दर देऊनही मोठ्या कंत्राटदारांकडून योग्य प्रकारे कामे केली जात नसून त्यांनी केलेली बहुतांशी कामे ही निकृष्ट दर्जाची असल्याचे सुनील प्रभू यांनी म्हटले आहे.
त्यात आता महापालिकेने डब्ल्यू ४३९ अंतर्गत वांद्रे पश्चिम भागातील रंगशारदा परिसरातील रस्त्यांच्या सुधारणांसाठी टेंडर मागवले आहे. तब्बल १०० कोटी रुपयांच्या या कामांसाठी महापालिकेने विशिष्ट अटी घातल्या आहेत, जेणेकरून दोन ते तीनच कंपन्या यात पात्र होतील. या टेंडरसाठी आठ वेळा मुदत वाढवतानाच आठव्या सुधारणा पत्रकात पहिल्या पत्रकाच्या तुलनेत बदल करण्यात आला. ज्यामुळे यात अन्य कंपन्या सहभागी होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आल्याचे दिसून येते.
कंत्राटदाराच्या विशेष गटाला अनुकूल करण्यासाठी प्रसिद्ध केलेली टेंडर अटींची सर्व सुधारणा पत्र तात्काळ रद्द करण्यात याव्यात आणि नव्याने अटी शर्तीसह तात्काळ टेंडर निमंत्रित करण्यात याव्यात अशी मागणी प्रभू यांनी केली आहे. महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याने संगनमत करून ठेकेदारासाठी ही व्यूहरचना केली त्याची चौकशी करावी, अशी मागणी प्रभू यांनी केली आहे.
महापालिकेच्या पैशांचा अपव्यय करून केवळ एका ठेकेदाराला मदत करण्यात येत आहे. एखाद्या मित्राला जर शंभर कोटी रुपये देण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न होत असेल आणि महापालिकेचे अधिकारी हे काम करत असतील तर, हा मोठा भ्रष्टाचार आहे, याची चौकशी व्हायला हवी. ज्यांनी ज्यांनी हे कटकारस्थान करून काम दिले, त्या सर्व अधिकाऱ्यांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी देखील प्रभू यांनी केली आहे.