मुंबई (Mumbai) : सर्वसामान्य नागरिकांच्या डोक्याला ताप ठरलेल्या क्लीनअप मार्शलला (Cleanup Marshal) कायमची सुट्टी देण्याचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने (BMC) घेतला आहे. मुंबई स्वच्छ (Clean Mumbai) राखण्यासाठी आता क्लीनअप मार्शलऐवजी ‘उपद्रव शोधक पथका’ची नियुक्ती करणार आहे. त्यासाठी १५ संस्थांचे अर्ज आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबई महापालिकेने आपल्या २४ प्रशासकीय विभागांत क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकणे, कचरा टाकणे आदी प्रकार थांबवून संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी क्लीनअप मार्शलवर होती. कोरोना काळात विनामास्क फिरणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलच्या माध्यामातून दंडात्मक कारवाई केली जात होती. ३१ मार्चला त्यांच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, त्यामुळे पालिकेने नवीन संस्थांना काम देण्याचा निर्णय घेतला आहे.
क्लीनअप मार्शलऐवजी ‘उपद्रव शोधक पथक’ नियुक्त करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यासाठी पालिकेने टेंडर मागिवले असून, त्याला १५ संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. क्लीनअप मार्शल अरेरावीने कारवाई करत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अनेकदा सामान्य नागरिक आणि मार्शल यांच्यात खटके उडत होते, वादावादीही होत होती. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर क्लीपअप मार्शलचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मार्शलची जागा घेणार 'हे' पथक
पालिकेच्या २४ विभाग कार्यालयांच्या अखत्यारित ‘उपद्रव शोधक पथका’ची नियुक्ती केली जाणार आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर या पथकाद्वारे कारवाई केली जाणार आहे. या पथकाला वेगळा गणवेशही दिला जाणार आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.