मुंबई (Mumbai) : मुंबईत महापालिकेच्या (BMC) माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगात सुरू असून, नालेसफाई 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना ठरलेल्या गाळाच्या वजनापेक्षा जास्त गाळ 30 मे रोजी काढण्यात आला आहे. यानंतरही आवश्यकतेनुसार नाल्यांमध्ये गाळ दिसून आल्यास वाढीव गाळ काढला जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. मुंबईतील 340 किमीच्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी व त्यातील गाळ काढून त्याची वाहतूक करून गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिका यंदा 160 कोटी रुपये खर्च करीत आहे.
मुंबईत दरवर्षी मार्चच्या मध्यावर सुरू होणारे नालेसफाईचे काम या वर्षी उशिरा सुरू झाले. 7 मार्च रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्याने नालेसफाईचे प्रस्ताव मंजुरीसाठी रखडले होते. मात्र पालिका आयुक्त, प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी प्रस्तावांना मंजुरी दिल्याने 11 एप्रिलला कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली. या वर्षी 31 मेपर्यंत 919798.78 मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, यातील 910957.684 मेट्रिक टन म्हणजेच 100.97 टक्के गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये शहर विभाग आणि मिठी नदीमधील 3 टक्के गाळ काढण्याचे काम बाकी आहे. हा गाळही निर्धारीत वेळेत काढून होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
या वर्षी नालेसफाई उशिरा सुरू झाल्यामुळे कंत्राटदारांवर तीन शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्बंध होते. नालेसफाईवर नजर ठेवण्यासाठी सातही परिमंडळांत भरारी पथक व नागरिकांच्या माहिती मिळावी-तक्रार करता यावी यासाठी 'डॅशबोर्ड'ही सुरू करण्यात आला आहे.
कंत्राटदारांना नालेसफाईच्या कामाचा मोबदला देताना डंपिंग ग्राऊंडवर गाळ टाकतानाचे वजन करून त्यानुसारच पैसे देण्यात येणार आहेत. कामात दिरंगाई करणाऱ्या शहर विभागातील कंत्राटदाराला साडेतीन लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे मुदतीपूर्वीच नालेसफाईचे उद्धिष्ट पूर्ण झाले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
मुंबईतील 340 किमीच्या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी व त्यातील गाळ काढून त्याची वाहतूक करून गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका यंदा 160 कोटी रुपये खर्च करीत आहे. तर पावसाळ्यात सखल भागांत साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी यंदा पालिका 350 ऐवजी 400 ठिकाणी पंप बसविणार आहे. या पंपिंगच्या व्यवस्थेवर किमान 80 ते 90 कोटी रुपये असे एकूण 250 कोटींचा खर्च करणार आहे.
मुंबई शहरात एकूण 32 मोठे नाले असून यामधून 30,142 मेट्रिक टन गाळ, पूर्व उपनगरात झोन-5 मध्ये 79,000 मेट्रिक टन, तर झोन-6 मध्ये 3700 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे. पश्चिम उपनगरात 53 मोठे नाले आहेत. यामधून 75,000 मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे.
नालेसफाईच्या कामाची टक्केवारी...
- मुंबई शहर : 103.06 टक्के
- पूर्व उपनगर : 103.52 टक्के
- पश्चिम उपनगर : 96.61 टक्के
- छोटे नाले : 105.16 टक्के
- मिठी नदी : 96.39 टक्के