मुंबई (Mumbai) : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो रेल्वेचा (Colaba-Bandra-Seepz Metro Line) आरे ते बीकेसी (Aarey - BKC) हा पहिला टप्पा डिसेंबर 2023 मध्ये सुरू होईल; तर बीकेसी ते कुलाबा (BKC - Colaba) हा दुसरा टप्पा जून 2024 मध्ये सुरू होईल, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता यांनी दिली. (Mumbai Metro)
मुंबई मेट्रो तीनवरील एमआयडीसी स्टेशनच्या कामाच्या पाहणीनंतर एस. के. गुप्ता यांनी या प्रकल्पाची माहिती दिली. मेट्रो तीनच्या प्रकल्पाचे काम ऑक्टोबर 2016 मध्ये सुरू झाले. आतापर्यंत 76.6 टक्के प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर एकूण 27 स्टेशन असून त्यातील 26 स्टेशन भूमिगत असतील. भूमिगत स्टेशनसाठी बांधण्यात आलेल्या भुयारांचे 99.6 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो मार्ग-3 ची एकूण लांबी 33.5 किमी असून हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात 26 भुयारी आणि एक जमिनीवरील अशी 27 स्थानके असून वर्ष 2031 पर्यंत 17 लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर नरिमन पॉईंट, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्रे मेट्रोने जोडली जातील. कुलाबा ते आंतरराष्ट्रीय विमानतळ 50 मिनिटांत प्रवास करणे सहज शक्य होणार आहे.