मुंबई (Mumbai) : बेस्ट (BEST) उपक्रमात भाडेतत्त्वावर सुरू असलेल्या हंसा कंपनीने २६२ मिडी एसी बस गाड्यांची सेवा १० ऑक्टोबरपासून बंद केली आहे. यापुढे या बस चालविणे आपणास शक्य होणार नाही, असे कंपनीने बेस्ट प्रशासनाला स्पष्ट केले आहे.
या महिन्याच्या १० तारखेपासून हंसा कंपनीने आपल्या मिडी एसी बसेस चालविण्याचे बंद केले आहे. हंसाच्या २६२ बसेस मरोळ, दिंडोशी व ओशिवरा बस आगारात कार्यरत होत्या. तसेच काही बसेस शिवडी व काळाचौकी परिसरातही धावत होत्या. त्या बंद झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.
कुलाबा येथील बेस्ट भवनमध्ये हंसा कंपनी व बेस्ट प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकीतही कंपनीच्या प्रतिनिधीने आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यापुढे भाडेतत्त्वावर बस चालवणे आम्हाला शक्य होणार नाही, असे कंपनीने सांगितले आहे.
हंसा कंपनी आणि बेस्टमधील कराराची अंमलबजावणी पुढील काळात करणे शक्य होणार नाही. त्यामुळे बेस्ट व कंत्राटदार यांच्यात झालेला करार लवकरच संपुष्टात आणण्याबाबत कायदेशीर कार्यवाही केली जाईल, असे बेस्टमधील उच्चपदस्थांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमात सध्या १,०४७ बस आहेत. त्यापैकी ५५० बसेस या डिसेंबर अखेर आयुर्मान पूर्ण झाल्याने ताफ्यातून काढाव्या लागणार आहेत, तर उर्वरित बस ऑक्टोबर २०२६ मध्ये भंगारात जाणार आहेत.