मुंबई (Mumbai) : पश्चिम रेल्वेच्या वांद्रे टर्मिनस ते खार रोड स्थानकाला जोडणारा नवीन पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला झाला आहे. हा पादचारी पूल बांधण्यासाठी रेल्वेला सुमारे १४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना वांद्रे टर्मिनस ते मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गाच्या खार रोड स्थानकात उतरता येणार आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस ते खार रोड दरम्यानच्या पादचारी पुलासाठी १४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या नव्या पुलाची लांबी ३१४ मीटर आणि रुंदी ४.४ मीटर आहे. या पुलाचा बांधकामात ५१० मेट्रिक टन स्टील, २० मे. टन रिइंफोर्समेंट स्टील आणि २४० घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे आता प्रवाशांना नव्या पादचारी पुलाने खार रोडवरुन थेट वांद्रे स्थानकात उतरता येणार आहे. वांद्रे टर्मिनसच्या फलाट क्रमांक १ च्या उत्तर दिशेकडून खार रोड येथील आणि दक्षिण पादचारी पुलाला हा नवा पादचारी पूल जोडला आहे. पश्चिम रेल्वेकडून चालू आर्थिक वर्षात मुंबई विभागात एकूण ७ पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.