मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाच्या दोन लेन ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येतील आणि संपूर्ण पूल डिसेंबर अखेरपर्यंत खुला होईल, असा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने ७ नोव्हेंबर २०२२ पासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मे २०२३ पर्यंत पुलाच्या दोन लेन सुरू करण्यात येतील, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. मात्र रेल्वे हद्दीतील खोदकाम, विविध परवानग्या यामुळे रखडलेला गोखले पूल कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित केला जात होता. महापालिका व रेल्वे प्रशासन या सर्व संबंधित यंत्रणांनी योग्य समन्वय राखून वेगाने या प्रकल्पाचे काम पूर्ण व्हावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या प्रकल्पाच्या गतीवर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू हे स्वत: लक्ष ठेवून आहेत. तसेच वेलरासू हे स्वत: प्रकल्पास नियमितपणे भेटी देऊन कामाचा आढावा घेत आहेत.
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये सुमारे १ हजार २५० टन वजनाचा गर्डर महत्त्वाचा असणार आहे. या गर्डरसाठी १ हजार २७० मेट्रिक टन पोलाद (स्टील) खरेदी करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर, गर्डरची २५ टक्केपेक्षा अधिक जुळवाजुळव (फॅब्रिकेशन) अंबाला येथील कारखान्यात पूर्ण झाली आहे.
पश्चिम रेल्वेने जुना पूल पूर्णपणे तोडून २८ मार्च २०२३ रोजी महानगरपालिकेकडे प्रकल्पाचे कामकाज हस्तांतरित केले. तेव्हापासून आत्तापर्यंत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे तब्बल ८० टक्के कामदेखील पूर्ण झाले आहे. उर्वरित कामदेखील लवकरच पूर्ण होईल. याचाच अर्थ गोखले पुलाचा पहिला टप्पा दोन मार्गिकांच्या रूपात ऑक्टोबर २०२३ अखेरपर्यंत आणि संपूर्ण पूल डिसेंबर २०२३ अखेर सुरू होईल, असे सांगण्यात येत आहे.