नवी दिल्ली (New Delhi) : देशातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात २०३० पर्यंत १० लाख लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे, असे भारतीय अपारंपरिक ऊर्जा विभागाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कुमार दास यांनी सहकारी संस्थांसाठी आयोजित कार्यक्रमात सांगितले.
" सध्या क्षेत्रातील अंदाजे १.१ लाख रोगजारांपेक्षा हे प्रमाण दहापट अधिक असेल. ९०टक्क्यांहून अधिक अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प ग्रामीण भागात आले आहेत.त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. हवामान बदल आणि पर्यावरणीय ऱ्हासाचे परिणाम समजून घेण्यासाठी सहकारी संस्थांच्या क्षमता वाढविण्याच्या गरजेवर दास यांनी भर दिला. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला. कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्पांसाठी, भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्थेने निधी मर्यादा प्रकल्प खर्चाच्या ७० टक्क्यांपर्यत वाढवली आहे, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना ऊर्जादाता' बनवण्याच्या प्रमुख उपक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान-कुसुम योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. शेतकर्यांना ऊर्जा आणि पाणी सुरक्षा प्रदान करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, पर्यावरणीय प्रदूषण कमी करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. ३५ लाखांहून अधिक शेतकर्यांचे कृषी पंप आता सौर ऊर्जेवर चालतात. स्वच्छ ऊर्जा प्रदान करण्याचा हा जगातील सर्वांत मोठा उपक्रम आहे. या योजनेमुळे कुशल आणि अकुशल कामगारांसाठी ७.५५ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. ई-मोबिलिटी, हरीत हायड्रोजन हे पुढील ५ ते ७ वर्षांमध्ये देशातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी अपेक्षा असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले.