मुंबई (Mumbai) : अवघ्या १४ कोटीत अपेक्षित असलेल्या हॅंकॉक ब्रीजच्या (Hancock Bridge) बांधकामाचा खर्च सहाच वर्षांत पाच पटीने वाढत ७५ कोटींवर गेला आहे. महत्त्वाचे म्हणजे, १८ महिन्यांत पूर्ण होणारे हे काम सहा वर्षानंतरही अपूर्णच आहे. (BMC News)
मुंबईतील डोंगरी आणि माझगाव परिसराला जोडणाऱ्या हॅंकॉक ब्रीजची एक बाजू खुली करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने १ ऑगस्टचा मुहूर्त साधत या चारपदरी ब्रीजच्या दोन लेन नागरिकांसाठी खुल्या केल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार अंतरिम दिलासा म्हणून या ब्रीजच्या एका बाजूच्या लेनची वाहतूक ही वाहनांसाठी आणि स्थानिक पादचाऱ्यांसाठी खुली करण्यात आली आहे. डोंगरी भागातून माझगाव परिसराला जोडणाऱ्या या ब्रीजमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण दुसऱ्या लेनच्या रखडपट्टीमुळे ब्रीजवरून वाहतूक संपूर्ण क्षमतेने खुली होण्यासाठी आणखी काही वर्षे लागण्याची चिन्हे आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपामुळे सातत्याने ब्रीजच्या डिझाईनमध्ये झालेला बदल प्रकल्प रखडण्यामागचे मोठे कारण आहे.
या ब्रीजच्या ठिकाणी अद्यापही रंगरंगोटीची कामे अपूर्ण आहेत. तसेच रस्त्याच्या रिसरफेसिंगचे कामही शिल्लक आहे. वाहन चालकांसाठीची दिशादर्शक चिन्हे देखील ब्रीजवर लावण्यात येणे अपेक्षित आहे. त्यामुळेच एका बाजूची वाहतूक खुली करण्यात आली असली तरीही चारही लेनचे काम होत नाही, तोवर हा प्रश्न सुटणार नाही. ब्रीजच्या सुरूवातीलाच तात्पुरत्या स्वरूपाचे फेन्सिंग करण्यात आले आहे, परंतू हे वळणाच्या ठिकाणीच असल्याने येथे अपघाताचा धोका आहे.
जानेवारी २०१६ मध्ये हॅंकॉक ब्रीज पाडण्यात आला. फेब्रुवारी २०१८ मध्ये मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने हॅंकॉक ब्रीजच्या अतिरिक्त खर्चासाठी ५० कोटी रुपयांना मंजुरी दिली. फेब्रुवारी २०२२ मुंबई महानगरपालिकेने २५ कोटी रूपयांचा अतिरिक्त खर्चाचा प्रस्ताव मांडत, ६०० मेट्रिक टनच्या लोखंडी गर्डची क्षमतावाढ करत १३०० मेट्रिक टन क्षमतावाढीचा प्रस्ताव दाखल केला. डिसेंबर २०२०मध्ये पादचाऱ्यांसाठी या ब्रीजचा मार्ग खुला करण्यात आला. १ ऑगस्ट रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार तात्पुरती व्यवस्था म्हणून ब्रीजच्या दोन लेन वाहनचालकांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत.
दुसऱ्या बाजूच्या दोन लेनचे काम पूर्ण करण्याचे आव्हान मुंबई महानगरपालिकेसमोर आहे. याठिकाणी असणाऱ्या म्हाडाच्या सेस इमारती, तसेच खासगी इमारतींमधील रहिवासी, तसेच गाळेधारक यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे दुसऱ्या लेनचे काम रखडले आहे. इमारतींमधील रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था होत नाही, तोवर कामाला सुरूवात होऊ शकणार नाही. इमारती हटवल्यानंतरच या ब्रीजचे काम पुढे सरकेल.
म्हाडाच्या सेस इमारतीतील रहिवाशांना घर खाली करण्याची नोटीस म्हाडाकडून याआधीच बजावण्यात आली आहे. शेखभाई बिल्डिंग ही धोकादायक इमारत म्हणून म्हाडाने घोषित केली आहे. तसेच पर्यायी ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पची व्यवस्थाही म्हाडाकडून करण्यात आली आहे. तर शेजारील थावर मेंशन ही खासगी इमारत आहे. परंतू या इमारतीमधील रहिवासी आणि गाळेधारक यांच्याशी अद्यापही पालिकेने कोणताही संपर्क साधलेला नाही.
दरम्यान, गेल्या ७० वर्षांमध्ये जुन्या हॅंकॉक ब्रीजच्या अनेक आठवणी आमच्यासोबत आहेत. पण आता शेखभाई इमारत धोकादायक जाहीर केल्याने ट्रांझिट कॅम्पमध्ये जाण्याशिवाय आमच्यासमोर पर्याय नाही. परंतू हा ब्रीज खुला झाल्याने माझगाव परिसरातील तसेच डोंगरी भागातील नागरिकांची नक्कीच सोय होईल, अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवासी प्रकाश मयेकर यांनी दिली.
तर सध्या फक्त दोन लेन खुल्या करण्यात येणार आहेत. हा ब्रीज पी डीमेलो रोडला कनेक्ट करण्यात आलेला नाही. त्यामुळे ५ किलोमीटर फिरून या रोडला लोकांना कनेक्ट व्हावे लागेल. परिणामी भायखळा जेजे फ्लायओव्हरच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते, असे सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी स्पष्ट केले.
डोंगरी आणि माझगाव या दोन्ही दिशेला असणाऱ्या चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन होणार नाही, तोवर दुसऱ्या बाजूचे काम पूर्ण होणार नाही. परंतु वॉर्ड पातळीवर या रहिवाशांच्या स्थलांतराचे काम सुरू आहे. लवकरच हे पुनर्वसन करण्याची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
- सतीश ठोसर, मुख्य अभियंता, ब्रीज विभाग, मुंबई महानगरपालिका