मुंबई (Mumbai) : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी बलाढ्य उद्योगपती गौतम अदानी यांच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) प्रख्यात अमेरिकन डिझायनिंग कंपनी सासाकी, ब्रिटीश कन्सल्टन्सी फर्म ब्यूरो हॅपोल्ड आणि वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर यांच्याशी या प्रकल्पाच्या नियोजन आणि डिझाईनसाठी करार केला आहे.
सासाकी आणि ब्युरो हॅपोल्ड या शहरी नियोजन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील सुप्रसिद्ध कंपन्या आहेत. सासाकीकडे 70 वर्षांचा अनुभव आहे तर ब्युरो हॅपोल्ड हे सर्जनशील आणि मूल्य-आधारित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ओळखले जातात. त्याचप्रमाणे वास्तुविशारद हाफीज कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील सामाजिक गृहनिर्माण आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्पांतील अग्रगण्य म्हणून ओळखले जातात. यासोबतच सिंगापूरमधील तज्ज्ञांनाही प्रकल्पाच्या टीमशी जोडण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2022 मध्ये, अदानीची रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी अदानी प्रॉपर्टीजने धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी सर्वात मोठी बोली लावली होती. डीआरपीपीएलमध्ये अदानी समूहाचा 80 टक्के आणि महाराष्ट्र सरकारचा 20 टक्के हिस्सा आहे. अदानी प्रॉपर्टीजने 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती. धारावी सुमारे 600 एकरमध्ये पसरलेली असून ती आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.
धारावीचा कायापालट करण्यासाठी 2004 मध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाची आखणी करण्यात आली. सुमारे 557 एकर भूखंडावर उभ्या असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी सन 2009 ते 2018 दरम्यान, तीन वेळा टेंडर काढण्यात आले. मात्र, या ना त्या कारणांमुळे ती टेंडर रद्द करण्यात आली. पुनर्विकास प्रकल्पाने 2022 मध्ये चौथ्यांदा टेंडर काढले आणि यात अदानी समूहाने बाजी मारली. राज्य सरकारने अदानी समुहाच्या टेंडरला मान्यता देऊन पुनर्विकासाच्या कामाला सुरूवात करण्याचा मार्ग मोकळा केला आहे.