मुंबई (Mumbai) : अदानी समूहाने (Adani Group) आता सिमेंट क्षेत्रात आपला विस्तार केला आहे. अदानी समूहाने स्विस कंपनी होल्सीम ग्रुपच्या सिमेंट कंपन्या - अंबुजा सिमेंट्स लि. आणि एसीसी लि.चा व्यवसाय विकत घेतला आहे. अदानींनी अंबूजा-एसीसी सिमेंटचा व्यवसाय तब्बल 80 हजार कोटींना विकत घेतला आहे. या व्यवहारानंतर अदानी समूह आता सिमेंट व्यवसायातील सर्वांत मोठी कंपनी बनली आहे.
अदानी समूहाने होलसिम समूहाचा भारतीय व्यवसाय ताब्यात घेण्याची बोली जिंकली आहे. देशातील प्रसिद्ध सिमेंट ब्रँड अंबुजा आणि एसीसी विकत घेण्यासाठी दोन बड्या भारतीय व्यावसायिकांमध्ये शर्यत होती. अदानी समूहाव्यतिरिक्त सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील जेएसडब्ल्यू समूहही या शर्यतीत होता. दुसरीकडे, अल्ट्राटेक सिमेंट तांत्रिक कारणांमुळे या शर्यतीत मागे पडली.
होल्सीम ग्रुप भारतात जवळपास 17 वर्षांपासून व्यवसाय करत आहे. होल्सीमची ओळख भारतात प्रामुख्याने अंबुजा सिमेंट, एसीसी लि. या ब्रॅंडद्वारे केली जाते. अंबुजा सिमेंट, एसीसी लिमिटेड भारतीय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहेत.
अंबुजा सिमेंटचे बाजारमूल्य 70 हजार कोटींहून अधिक आहे. होल्सीम ग्रुपची या कंपनीत 63.19 टक्के हिस्सेदारी आहे, तर एसीसीचे बाजार भांडवल 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये स्विस कंपनीचा 54.53 टक्के हिस्सा आहे. अदानी समूहाने गेल्या वर्षी अदानी सिमेंट इंडस्ट्रीज या नावाने सिमेंट क्षेत्रात प्रवेश केला. एसीसी ताब्यात घेतल्यानंतर, अदानी सिमेंटची सिमेंट क्षेत्रात मक्तेदारी निर्माण होणार आहे.
याबद्दल अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी म्हणाले, की भारताच्या विकासगाथेवर आमचा विश्वास अढळ आहे. भारतातील होल्सीम सिमेंट कंपन्यांना आमच्या ग्रीन एनर्जी आणि लॉजिस्टिकशी जोडल्याने आम्ही जगातील सर्वांत जास्त ग्रीन सिमेंट कंपनी बनू.
अदानी समूह आता भारताच्या 200 अब्ज डॉलर बाजारमूल्याच्या तीन सदस्यीय क्लबमध्ये सामील झाला आहे. अदानी ग्रुप व्यतिरिक्त या क्लबमध्ये रिलायन्स ग्रुप आणि टाटा ग्रुपचा समावेश आहे. अदानी समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप म्हणजे एकूण बाजारमूल्य आता 16 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. या कंपन्यांच्या शेअर्सनी बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना देखील श्रीमंत केले आहे. देशातील टॉप-टेन कंपन्यांमध्ये अदानी ग्रीनचा समावेश झाला आहे.