मुंबई (Mumbai) : अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाच्या रेल्वेच्या हद्दीतील भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मागवलेल्या टेंडरमध्ये पाच कंपन्यांनी सहभाग घेतल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली. या कामावर सुमारे ८४ कोटी खर्च अपेक्षित आहे. तर हा नवीन पूल बसवण्यासाठी एकूण आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.
गोखले पूलाची पुनर्बांधणी करताना रेल्वेच्या हद्दीतील बांधकामही महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने तयार केलेल्या संकल्प आराखड्यावर आयआयटीने शिक्कामोर्तब केल्यानंतर महानगरपालिकेच्या पूल विभागाने या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले होते. ही टेंडर शुक्रवारी उघडण्यात आली. या पूलाचे बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने आधीच पूलाच्या उताराच्या भागासाठी टेंडर मागवून ८७ कोटी रुपयांच्या कामासाठी कंत्राटदार नेमले होते. पहिल्यांदाच पूलाचा अर्धा अर्धा भाग तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा प्रयोग करण्यात आला होता. आता रेल्वेच्या हद्दीतील पुलाचे बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेने तयारी सुरू केली आहे.
रेल्वे हद्दीत नवीन पूल बसवण्यासाठी एकूण आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एक महिना टेंडर प्रक्रिया, तुळईचे भाग तयार करण्यासाठी तीन चार महिने, प्रत्यक्ष पूल बसवण्यासाठी तीन महिने असा एकूण सात महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे पूल वेळेत पाडून झाल्यास उशीरात उशीरा जून २०२३ पर्यंत पूलाचे काम पूर्ण होईल, अशी माहिती देण्यात आली.
रेल्वे हद्दीतील पुलाच्या तुळईचे (गर्डर) काम अन्यत्र करण्यात येणार आहे. तुळईचे भाग तयार करून ते जागेवर आणून जोडले जाणार आहेत. त्यानंतर त्यावर सिमेंट काँक्रिटची जोडणी करण्यात येणार आहे. या कामासाठी चार महिने लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ही तुळई आणून प्रत्यक्ष ठिकाणी बसवली जाणार आहे. मात्र या चार महिन्यांमध्ये पूल पाडण्याचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.