मुंबई (Mumbai) : तुर्भे (Turbhe) ते खारघर (Kharghar) भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामासाठी सिडकोने सल्लागार नेमण्यासाठी टेंडर (Tender) प्रक्रिया सुरू केली आहे. हा भुयारी मार्ग झाल्यास चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून वेळ व पैशाचीही बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
सायन-पनवेल महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ वाढत आहे. ठाणे, पनवेल, कल्याण-डोंबिवली आणि पुढे कळंबोली-जेएनपीटी, पुणे आदी ठिकाणी जाणारी वाहने याच मार्गावरून जातात. या मार्गावरून ताशी ७० किलोमीटर वाहने वेगाने धावणे अपेक्षित आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे ताशी ४० ते ५०च्या वेगाने वाहने धावतात.
त्यातच वाशी खाडीपुलावर चौथा पूल बांधणे प्रस्तावित आहे. हा पूल बांधून पूर्ण झाल्यावर सायन-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून तुर्भे ते खारघर भुयारी मार्ग तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. तसेच सिडकोकडून खारघरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर 'खारघर कार्पोरेट पार्क' उभारण्यात येणार आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी तुर्भे ते खारघर असा नियोजित भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले.
तुर्भे-खारघर भुयारी मार्गासंदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, दोन दिवसांपूर्वी सल्लागार नियुक्तीचे टेंडर काढण्यात आले आहे. लवकरच सल्लागार नेमले जातील, असे सांगण्यात आले.
पारसिक बोगद्यातून मार्ग
सायन-पनवेल महामार्गावर बेलापूर, नेरूळ, कळंबोली सर्कल परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. ही कोंडी टाळण्यासाठी दोन्ही दिशांना कोणताही पर्याय नसल्याने तुर्भे ते खारघर असा पर्यायी मार्ग बांधण्यात येणार आहे. तुर्भे एमआयडीसी ते खारघर येथील गुरुद्वारापर्यंत हा भुयारी मार्ग असेल. पारसिक डोंगरातून हा मार्ग काढण्यात येणार असून सिडकोच्या खारघर कार्पोरेट पार्कला जोडणार आहे. एकूण सहा किमीचा रस्ता असून त्यामुळे मुंबईतून तळोजा एमआयडीसीत जाणे सहज शक्य होईल.
मार्गाची वैशिष्ट्ये -
- तुर्भे येथील दगडखाण असलेल्या डोंगरातून मार्ग सुरू होणार असून खारघर येथील सिडकोच्या कार्पोरेट पार्कला जोडणार.
- मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून थेट खारघर, तळोजा आणि कळंबोली स्टील मार्केटला जाणे सुलभ होणार.
- मुंबई, ठाणे परिसरातील गोल्फ खेळणाऱ्या खेळाडूंना खारघर गोल्फ कोर्स तसेच सेंट्रल पार्कमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी सोयीचा मार्ग