मुंबई (Pune) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (JNPT) अंतर्गत भागांना जोडणारे अनेक नवीन रस्ते जोडणी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यावर सुमारे 3,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.
ट्विटरद्वारे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही माहिती दिली. गडकरी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार, संपूर्ण देशातील बंदरे आणि देशांतर्गत उत्पादन तसेच ग्राहक केंद्रे यांच्यात वाढते दळणवळण प्रस्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून जागतिक दर्जाचे रस्ते तयार करून विविध बंदरांच्या निर्मितीद्वारे विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
गडकरी म्हणाले, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या अंतर्गत भागांना जोडणारे अनेक नवीन रस्ते जोडणी प्रकल्प हाती घेतले आहेत. सुमारे 3,500 कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्ग-4B (नवीन एनएच-348, 548) आणि राज्य महामार्ग-54 (नवीन एनएच-348A) या मार्गांची पुनर्बांधणी आणि सुधारणा करण्याचे काम हाती घेतले आहे.
या सुमारे 48 लाख वाहनांची प्रचंड रहदारी असलेल्या विभागात या प्रकल्पांची पूर्तता झाल्यानंतर प्रवासाचा वेळ आणि वाहनांवरचा खर्च कमी होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासह निर्यात आणि दळणवळण यामुळे या क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. करळ फाटा आणि गव्हाण फाटा येथील दोन ग्रेड सेपरेटरमुळे वाहनधारकांना जलदरित्या लेन बदलणे आणि राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर येणे सुलभ होणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.