मुंबई (Mumbai) : व्हीव्हीआयपी व्यक्तींचा रहिवास आणि राबता असणाऱ्या दक्षिण मुंबईतील ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट पर्यंत भुयारी मार्ग बांधण्याचा विचार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (MMRDA) सुरू आहे. पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंटपर्यंतचा हा भुयारी मार्ग ३.५ किमी लांबीचा असणार आहे. चार मार्गिकांसाठी सुमारे ४५०० कोटींचे बजेट आहे. या प्रकल्पाचा आराखडा तसेच सुसाध्यता अहवाल तयार करण्याचा ठेका जपानच्या मे. पडॅको कंपनीला मिळाला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट हे अंतर केवळ पाच मिनिटांत तर चेंबूर ते नरिमन पॉइंट प्रवास फक्त ३० ते ३५ मिनिटांत होणार आहे.
ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या वाहनांना दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने एमएमआरडीएने चेंबूर ते पी. डिमेलो रोड असा पूर्वमुक्त मार्ग बांधला आहे. १६.८ किमी लांबीचा हा पूर्वमुक्त मार्ग आहे. पूर्वमुक्त मार्गामुळे चेंबूर ते सीएसटी प्रवासाचा वेग वाढला आहे. मात्र चेंबूरवरून पुढे ठाण्याला जाण्यासाठी तसेच पी. डिमेलो रस्त्यावरून नरिमन पॉईंटला जाण्यासाठी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. वाहनचालकांचा हा त्रास दूर करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्गाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चेंबूर, छेडानगर ते ठाणे आणि पी. डिमेलो रस्ता, ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट असा विस्तार होणार आहे.
ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट असा विस्तार भुयारी मार्गाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी मार्ग एकूण ३.५ किमी लांबीचा आहे. चार मार्गिकांचा हा मार्ग असून त्यासाठी ४५०० कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे.
ऑरेंज गेट ते नरिमन पॉइंट भुयारी मार्ग प्रकल्प आता मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पाचा आराखडा तसेच सुसाध्यता अहवाल तयार करण्यासाठी टेंडर मागविले होते. यासाठी मे. बिवर इन्फ्रा कन्सल्टंट प्रा. लि. आणि मे. पडॅको कंपनी, जपान या कंपन्यांनी टेंडर सादर केली. दोन कंपन्यांच्या स्पर्धेत जपानच्या पडॅको कंपनीला हा ठेका मिळाला आहे. या सल्लागार कंपनीकडून चार महिन्यांत प्रकल्पाचा आराखडा सादर होईल. आराखडा मंजूर झाल्यानंतर कामास सुरुवात होईल. त्यासाठी सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल. साधारण जून – जुलै २०२३ मध्ये कामास सुरूवात होईल. काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे २०२५ अखेर हा भुयारी मार्ग सेवेत दाखल होईल.