मुंबई (Mumbai) : मुंबईतील भुयारी मेट्रो 3 म्हणजे कुलाबा वांद्रे सीप्झ या मार्गाच्या अंमलबजावणीत दिरंगाई झाल्यामुळे ६ वर्षात प्रकल्प खर्चात तब्बल 10 हजार कोटींची वाढ झाली आहे. मुख्यतः भूयारीकरण, स्थानके बांधणे आणि कारशेडची निर्मिती यावर ही सर्वाधिक खर्च वाढ होत आहे. 2018 च्या अंदाजानुसार प्रकल्प खर्च 23 हजार कोटी इतका अपेक्षित होता. आता या प्रकल्पाचा खर्च 33 हजार 406 कोटींवर गेला आहे.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडचा निर्णय पहिल्या तीन निर्णयांमध्ये घेतला. मेट्रो प्रकल्पाचे कारशेड आरे येथेच करणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. न्यायालयात ही बाजू मांडण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. आरे कारशेडचा विषय हा अहंकाराचा नाही, तर मुंबईकरांच्या प्रवासाच्या सुविधेचा असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आपत्कालीन विभागाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले. पण आरे कारशेडची जागा हलवून दुसऱ्या पर्यायी ठिकाणी कारशेड बांधण्यासाठी आणखी तीन ते चार वर्षे लागतील. त्यामुळेच सद्यस्थितीला आरेचा पर्यायच योग्य ठरू शकतो असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. आमच्या सरकारच्या काळात आरे कारशेडच्या ठिकाणी 25 टक्के काम पूर्ण झाले होते. आता कारशेड जोवर अस्तित्वात येत नाही, तोवर काम सुरू होऊ शकत नाही, असेही फडणवीस म्हणाले.
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसी) च्या माध्यमातून मेट्रो 3 भुयारी प्रकल्पाचे काम सुरू आहे. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५३.७८ किमी म्हणजेच ९८.६०% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामध्ये सर्वाधिक खर्च भूयारीकरण, स्थानके बांधणे आणि कारशेडची निर्मिती यावर वाढतो आहे. या तिन्ही गोष्टींचा प्रस्तावित खर्च हा 10 हजार 708 कोटी इतका होता. हाच खर्च आता दुप्पट म्हणजे 20 हजार कोटींच्या घरात गेला आहे. आधीच्या अंदाजानुसार प्रकल्पाच्या भूसंपादनाचा खर्च 590 कोटी अपेक्षित होता. सुधारीत अंदाजानुसार यात तिप्पट म्हणजे 1500 कोटी इतकी वाढ झाली आहे. आता प्रकल्पाचा पूर्ण होण्याचा कालावधीही एक वर्षाने पुढे गेला आहे. एमएमआरसीने वाढीव खर्चासाठीचा प्रस्ताव गेल्या वर्षी राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे पाठवला होता. या वाढीव खर्चासाठी आता केंद्र सरकारची मंजुरी प्रलंबित आहे.
माजी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालानुसार कांजूरमार्गचा पर्याय हा 1580 कोटी रुपये इतकी बचत करणारा आहे. त्यामध्ये भूसंपादन आणि बांधकामाच्या खर्चाचा समावेश आहे. शिवाय आरे कारशेडच्या तुलनेत कांजूरला अधिक क्षमतेच्या तसेच आणखी मार्गांसाठी कारशेड वापराचीही उपलब्धतता होऊ शकते. सध्या आरे कारशेडच्या ठिकाणी 30 रेक्स ठेवण्याची सुविधा आहे. हीच सुविधा कांजूरमार्ग येथे 55 रेक्स म्हणजे ट्रेन ठेवण्याची आहे. मेट्रो मार्ग 3, 4 आणि 6 साठीचा इंटिग्रेटेड डेपो म्हणूनही या कांजूरच्या जागेची उपयुक्तता असल्याचे समितीने आपल्या अहवालात नमूद केले होते. तसेच कांजूरला मार्ग 14 आणि मार्ग 6 साठीचे इंटरचेंजिंगचे स्टेशनही याठिकाणी प्रस्तावित करता येईल, असेही समितीने अहवालात सूचवले होते.
खर्च वाढता वाढे- (आकडे कोटींमध्ये)
कामाचे स्वरुप - प्रस्तावित - वाढ
बांधकामे - 10,708 - 18711
यंत्रणा - 3128 - 4391
भूसंपादन, पुनर्वसन - 590 - 1483
एकूण - 23,000 - 33,406