मुंबई (Mumbai) : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार (Vasai - Virar) महापालिका प्रशासनाकडून शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शहरात ३२४ धोकादायक इमारती असल्याची माहिती समोर आली आहे. पावसाळ्यापूर्वी यातील अतिजीर्ण ३० इमारती निष्कासित करण्यात येणार आहेत.
वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नालासोपारा, बोळिंज, विरार, वसई, पेल्हार, नवघर माणिकपूर, आचोळे, वालीव व पेल्हार या प्रभाग समितीत धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. इमारतीचा काही भाग नादुरुस्त असल्याने पावसाळ्यात राहणे धोकादायक ठरू शकते, मालमत्ता व जीवितहानीची शक्यता आहे, अशा धोकादायक इमारतींना वसई-विरार महापालिकेने नोटिसा पाठवल्या असून, पावसाळ्यात राहणे धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. धोकादायक ३२४ इमारतींपैकी ३० इमारती अतिधोकादायक आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
महापालिका जरी अशा इमारतींना निष्कासित करण्यासाठी नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आवाहन करत असली, तरी जाणार कुठे, असा प्रश्न दर वर्षी निर्माण होत असतो. नागरिक पालिकेचा इशारा गांभीर्याने न घेता कानाडोळा करतात. मात्र, जीवितहानीची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन खबदारीसाठी पावसाळ्यात राहण्यायोग्य नसलेल्या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे.
वसई-विरार महापालिकेने इमारत बांधताना आखून दिलेले नियम पाळत पुनर्बांधणी करणे बांधकाम व्यावसायिकाला नुकसानीचे ठरते. कारण ज्या इमारती कलेक्टर पासिंग आहेत तिथे जागेचा अभाव आहे. एफएसआय मिळत नाही. व्यावसायिकाला रहिवासी व वाणिज्य असा लाभ घेता येत नाही. अग्निशमन वाहने जाण्यासाठी मार्ग, उद्यान व सुविधा देणे कमी जागेत अडचणीचे ठरत असल्याने अशा इमारतींकडे बांधकाम व्यावसायिक पाठ फिरवतात व पुनर्बांधणीची समस्या सुटत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.