मुंबई (Mumbai) : कांदिवली पश्चिम येथील पोयसर जिमखान्याजवळ पुलाच्या बांधकामाचे टेंडर मुंबई महापालिकेने (BMC) प्रसिद्ध केले आहे. पुढील 18 महिन्यांत या पुलाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे कांदिवली पश्चिम येथील पोयसर चर्च, रघुलीला मॉल परिसरातील वाहतूककोंडी लवकरच फुटणार आहे.
या ठिकाणी पालिका 30 कोटींचा खर्च करून नवा पूल बांधला जाणार आहे. यामुळे कांदिवली पश्चिम येथील डहाणूकरकाडी, चारकोप सेक्टर-1 व 2 परिसरात होणारी वाहतूककोंडी दूर होणार आहे.
कांदिवली पश्चिम येथील पोयसर चर्चकडून एकच रस्ता असून तो सध्या वापरला जात नाही. हा भूखंड महापालिकेच्या विकास नियोजन आराखड्यात पुलासाठी आरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी पूल बांधण्यासाठी महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे. पोयसर नदीजवळील पारेख नगर येथे सध्या असलेला जुना पादचारी पूल पाडण्यात येणार आहे. यानंतर पोयसर जिमखाना येथे हा नवीन पूल बांधण्यात येईल.
या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणार असून, महावीर नगर ते कांदिवली स्टेशनपर्यंत जाताना नागरिकांना रिक्षासाठी 50 रुपये खर्च करावे लागतात. हा पूल झाल्यानंतर थेट बोरिवलीला जाणे सोयीस्कर होणार आहे. तसेच परिसरात होणाऱ्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजलाही यामुळे फायदा होणार आहे.
27 बाय 18 मीटर चार लेनचा हा पूल असेल. यावर पादचाऱ्यांना चालण्यासाठी स्वतंत्र मार्गिका असेल. 18 महिन्यांत पुलाचे काम पूर्ण करण्यात येईल. पुलासाठी एकूण 30 कोटी 15 लाख 20 हजार 828 रुपये खर्च अपेक्षित आहे.